लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, तसेच संशोधन वृत्ती विकसित होण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना अमेरिकेतील ‘नासा’, तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) या अवकाश संशोधन संस्थांची भेट घडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) सहकार्याने विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि ‘आयुका’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ निशांत सिंग, समीर धुरडे, प्रसाद आडेकर यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यात हा उपक्रम राबविण्यासाठीच्या परीक्षा, अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी घेण्याची तयारी ‘आयुका’ने दाखवली. तसेच उपक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ‘नासा’ आणि ‘इस्रो’ या संस्थांमध्ये भेटीसाठी निवड करण्यात येणार आहे.
‘नासा’ येथील भेटीसाठी २५, तर ‘इस्रो’ येथील भेटीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. त्यातून प्रत्येक केंद्र शाळानिहाय दहा विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेतून गुणवत्तेनुसार दीडशे विद्यार्थ्यांची निवड करून ‘आयुका’मध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम ७५ विद्यार्थी निवडले जाणार आहेत, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.
‘आयुका’च्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या निवड चाचणीसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधीच उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळू शकेल.