कृत्रिम प्रज्ञा, विदा विज्ञान, संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा शाखांना प्रतिसाद

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राबवण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी पदवी प्रवेशात संगणकाधिष्ठित अभ्यासक्रमांकडेच विद्यार्थ्यांचा कल आहे. त्यामुळे कृत्रिम प्रज्ञा, विदा विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तर स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी अशा काही शाखांचा प्रतिसाद कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> श्रावणामुळे खवय्यांची मटण, चिकन, मासळीकडे पाठ

सीईटी सेलकडून अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये झालेल्या प्रवेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अभियांत्रिकीच्या १ लाख ५८ हजार ५८५ जागांपैकी १ लाख १७ हजार ५८५ जागांवर विद्यार्थ्यांनी विविध शाखांना प्रवेश घेतला आहे. तर ४१ हजार जागा अद्याप रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.  अभियांत्रिकीच्या काही शाखांना उपलब्ध जागांपैकी सुमारे ८० ते ९० टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. गेल्या काही वर्षांतच सुरू झालेल्या कृत्रिम प्रज्ञा, विदा विज्ञान, यंत्रशिक्षण या शाखांतील अभियांत्रिकी जागांमध्येही चांगली वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.  

हेही वाचा >>> पुणे: फळांची आवक कमी; डाळिंब, लिंबू महागले

कृत्रिम प्रज्ञा, विदा विज्ञान, सायबर सुरक्षा, विदा अभियांत्रिकी अशा शाखांतील उपलब्ध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची संख्या १२ हजारांहून अधिक आहे. तर संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकीलाही १२ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला १८ हजार २२९, माहिती तंत्रज्ञान शाखेला ११ हजार ६५६, संगणक अभियांत्रिकीला २३ हजार ६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल कृत्रिम प्रज्ञा, विदा विज्ञानासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांकडे वाढत आहे. तर अभियांत्रिकीच्या मुलभूत शाखा असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत, मॅकेनिकल  अशा अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त आहेत. त्यात स्थापत्य अभियांत्रिकीच्या १७ हजार २६८ जागांपैकी ७ हजार १०३, मॅकेनिकलच्या २३ हजार १९३ जागांपैकी १२ हजार ६५, विद्युत अभियांत्रिकीच्या ११ हजार ७६० जागांपैकी ७ हजार १५२ जागांवरच प्रवेश झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students prefer towards computer courses in engineering degree pune print news ccp14 zws