सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव या उपोषणात सहभागी झाले आहेत.
हेही वाचा >>> पुणे : एकविसाव्या शतकातील शिक्षकांमध्ये कौशल्यांचा अभाव
विद्यापीठ प्रशासनाकडून कला, वाणिज्य, व्यवस्थापन, विज्ञान अशा विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमा शुल्कवाढ लागू केली आहे. वाढ विद्यापीठात शिकायला येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीला कोणत्याही पद्धतीचा आधार नाही. विद्यापीठ प्रशासनाने शुल्कवाढ नियमांनुसार करावी. त्यामुळे सध्याची शुल्कवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती स्थापन केली. युक्रांद, दलित पँथर, रिपब्लिकन युवा मोर्चा, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आदी संघटनांचा यात समावेश आहे. शुल्कवाढ मागे घेण्यासह मागेल त्या विद्यार्थ्याला वसतिगृह उपलब्ध करून देणे आदी मागण्याही आंदोलकांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी मंगळवारी उपोषण सुरू करण्यात आले.
हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यात २० जणांना नव्याने करोना संसर्ग
काही दिवसांपूर्वी विद्यापीठात विद्यार्थ्यांसह झालेल्या बैठकीत डॉ. आढाव यांनी सरकारने आईच्या दुधाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याची काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता उपोषणातही ते सहभागी झाले आहेत.