ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘डॉ. अब्दुल कलाम बुक बँक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत फिरती पुस्तक पेटी योजना कार्यान्वित करण्यामध्ये पं. दीनदयाळ सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना डॉ. अब्दुल कलाम फिरती पुस्तक पेटी योजना राबविली जात आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा आणि शहरांमध्ये महापालिका शाळांची यासाठी निवड करण्यात आली आहे. माहितीपर, संस्कारक्षम आणि प्रेरणादायी पुस्तकांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, थोर नेत्यांची चरित्रे आणि त्यांनी लिहिलेली मुलांसाठीची पुस्तके, समाजसुधारक-संत आणि उद्योजकांची चरित्रे, इंग्रजी विषय सहजपणे शिकविणारी पुस्तके, पर्यावरण जागृती, निसर्गसंवर्धक शेती अशा वैविध्यपूर्ण विषयांची निवड करून एका पेटीमध्ये किमान ८० ते १०० पुस्तकांचा समावेश असेल, अशी माहिती सेंटरचे अध्यक्ष विनायक आंबेकर यांनी गुरुवारी दिली. कर्नल (निवृत्त) अनंत गोखले आणि प्रसिद्ध कवयित्री हेमा लेले या वेळी उपस्थित होत्या.
एका शाळेमध्ये एक पेटी तीन महिने ठेवली जाईल. वाचनाच्या तासाला किंवा विषय शिक्षक न आलेल्या मोकळ्या तासाला ही पेटी वर्गात नेऊन विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके दिली जातील. पेटीमध्येच पुस्तक वाटपाची माहिती नोंदविण्यासाठी वही, वाचलेल्या पुस्तकाविषयीची विद्याथ्यार्ंची टिप्पणी घेण्यासाठीही सोय केली आहे. पेटी बदलताना संबंधित कार्यकर्ता वही आणि विद्यार्थ्यांच्या टिपण्या असलेले कागद मुख्यालयाकडे जमा करेल. फिरती पेटी पुस्तक योजनेसाठी तसेच पुस्तक भेट योजनेसाठी प्रायोजकत्व घेण्यात आले आहे. ५ हजार ७५० रुपये भरून कोणीही व्यक्ती प्रायोजक होऊ शकते. याखेरीज या योजनेसाठी नागरिक पुस्तकरूपाने किंवा आर्थिक स्वरूपात देणगी देऊन खरेदीची जबाबदारी संस्थेवर सोपवू शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा देणगी देण्यासाठी पं. दीनदयाळ सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेट रिसर्च, सरस्वती मंदिर संस्था आवार, १३५९ शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता, पुणे ४११००२ (दूरध्वनी क्र. २४४९७३९८ किंवा ९८२२०४४५२०) या पत्त्यावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा