पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिले गेलेले अंतर्गत, बहि:स्थ आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण नोंदवले गेले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्याची वेळ पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आली असून काही महाविद्यालयांच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदा जलद कार्यपद्धती राबवत लवकर निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. मात्र काही महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दिले गेलेले अंतर्गत गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाकडे नोंदवले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करायचा, असा प्रश्न परीक्षा विभागापुढे निर्माण झाला आहे. परिणामी, ज्या महाविद्यालयांनी गुण भरावयाचे राहून गेले आहेत, त्या महाविद्यालयांतील निकाल राखीव ठेवण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा >>>पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय कागदावरच; पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद
हेही वाचा >>>पुणे: टिंबर मार्केटमध्ये कोयता गँगकडून तिघांवर हल्ला
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अंतर्गत, बहि:स्थ, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण न भरलेल्या महाविद्यालयांना ऑनलाइन पद्धतीने गुण नोंदवण्यासाठी लिंक खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महाविद्यालयांना ८ ते १० ऑगस्ट हा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नसल्याचे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.