‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश न देणाऱ्या शाळांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न काही पालकांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांनाच शुक्रवारी केला. त्यामुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळ उडाला. ‘मला बोलावले आहे तर मग माझे ऐकावेच लागेल. अशा पद्धतीने कार्यक्रम होऊ शकत नाही आणि मी तो चालू देणार नाही’, अशा शब्दांत बापट यांनी पालकांना उत्तर दिले. त्याचवेळी या कायद्यांतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश न देणाऱ्या शाळांवर फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली असल्याचे स्पष्टही केले. मात्र, पुढच्या कार्यक्रमाला जायचे असल्याने त्यांनी लगेचच सभागृह सोडले.
शिव संग्राम विद्यार्थी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित विद्यार्थी हक्क परिषदेचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, शिक्षणमंत्री येऊ न शकल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर, भारती लव्हेकर, विनायक मेटे, अविनाश महातेकर, सदाभाऊ खोत, डॉ. सुधाकर जाधवर, तानाजीराव शिंदे या वेळी उपस्थित होते.
परिषदेच्या प्रारंभी दोन विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून समस्या मांडल्या. त्याचा परामर्श घेत चौफेर टोलेबाजी करीत गिरीश बापट यांनी विद्यार्थ्यांनाजिंकून घेतले. वारंवार हास्याची कारंजी फुलवत त्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या शैलीतच संवाद साधला. हे भाषण रंगत असतानाच दोन पालकांनी हात वर करून प्रश्न विचारायचा आहे, असे सांगितले. प्रश्न विचारण्यास माझी हरकत नाही. पण, तुम्हाला संयोजकांची परावानगी घ्यावी लागेल, असे बापट यांनी त्यांना सांगितले. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर काय कारवाई करणार असा थेट प्रश्नच पालकांनी उपस्थित केला. त्याच वेळी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये गदारोळ झाला. तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीने प्रश्न विचारायला सुरुवात केली.
प्रश्नांची सरबत्ती होत असल्याचे ध्यानात येताच सभाशास्त्राच्या संकेताला धरून कार्यक्रम होत नाही, असे सांगत बापट यांनी कार्यक्रम या पद्धतीने होऊ शकत नाही आणि मी तो चालू देणार नाही, असे मोठय़ा आवाजात सांगितले. मलाही तुमच्यापेक्षा मोठा आवाज काढता येतो. पण, मला बोलावले असेल तर तुम्हाला माझे ऐकावेच लागेल, असेही त्यांनी बजावले. २५ टक्के प्रवेश न देणाऱ्या शाळांवर फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषण संपताना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे असल्याने परवानगी द्यावी, अशी विनंती घेऊन सभागृह सोडले. काही पालकांनी बापट यांना गाडीमध्ये बसताना गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, बापट यांना घाई असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही, असे प्रकाश काळे आणि दत्ता मारणे या पालकांनी सांगितले.

अर्धे वर्ष संपले तरी मुले घरीच !
यंदा १४ ऑगस्टपूर्वी ‘आरटीई’चे प्रवेश करावेत असा न्यायालयाने निकाल देऊनही कोथरूड परिसरातील दोन शाळा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देत नाहीत. स्थानिक आमदारांची भेट घेतली. पण, त्याही आमच्या बाजूने नाहीत. पालकमंत्री भेटत नाहीत. पत्र पाठविले तर त्याची पोहोच मिळत नाही. आमच्या मुलांची सरकारनेच निवड केली आहे. आता शाळा त्यांना प्रवेश देत नाहीत यात त्यांची काय चूक? अर्धे वर्ष संपले तरी मुले अजून घरीच बसून आहेत. यामध्ये त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्याची जबाबदारी कोण घेणार, अशा शब्दांत प्रकाश काळे आणि दत्ता मारणे यांनी व्यथा बोलून दाखविली.

लावणीच्या कार्यक्रमावर गदा
विद्यार्थी हक्क परिषद लांबल्याचा फटका ‘लावणी ऑन फायर’ या कार्यक्रमाला बसला. दुपारी साडेबारा वाजता होणारा कार्यक्रम वेळेत सुरू होत नसल्याने रसिकांनी पैसे परत घेतल्याने लावणीच्या कार्यक्रमावरच गदा आली. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर हे कलाकारांसाठी की राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमासाठी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कार्यक्रमाची नियोजित वेळ दहा वाजता होती. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आगमानानंतर पावणेअकराच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांची मनोगते आणि राजकीय नेत्यांची भाषणे यामुळे कार्यक्रम लांबत गेला. त्यामुळे ‘लावणी ऑन फायर’ कार्यक्रमासाठी आलेल्या रसिकांचा हिरमोड झाला. विद्यार्थी हक्क परिषदेसाठी सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळात नाटय़गृह शिवसंग्राम संघटनेला दिले होते. मात्र, कार्यक्रम लांबला असला तरी पुढचा कार्यक्रम असल्याने तुम्ही वेळेत संपवावा, असे निरोप चार वेळा दिले असल्याची माहिती व्यवस्थापक भारत कुमावत यांनी दिली. यामुळे कार्यक्रमासाठी केलेला सर्व खर्च वाया गेला. रसिकांना तिकिटाचे पैसे परत करावे लागले. यातून एक लाख रुपयांचा फटका बसल्याचेही टीना शर्मा यांनी सांगितले.

Story img Loader