पुणे महापालिकेच्या शाळेतील सहा मुलांना गोवर अणि रुबेलाची लस दिल्यानंतर उलट्यांचा त्रास झाल्याची चर्चा होती. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांनी लस घेण्यापूर्वी काही खाल्ले नसल्याने किंवा तेथील वासामुळे त्यांना त्रास झाला असावा असे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी याचा इन्कार केला आहे.

पुणे महापालिकेच्या दत्तवाडीमधील अग्रवाल शाळेत आज दुपारच्या सुमारास गोवर आणि रुबेलाची लस काही विद्यार्थ्यांना देण्यात आली. ही लस दिल्यानंतर काही त्रास होत नाही, असे सांगण्यात येत होते. मात्र, या सहा मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्यावर शिक्षकांनी त्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ जवळील एका खासगी रुग्णालय दाखल केले. या घटनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात पसरताच एकच खळबळ माजली.

या प्रकरणावर पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हकारे म्हणाले, राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राज्यभरात गोवर अणि रुबेलाची लस देण्यात येत आहे. पुणे शहरात एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास झाला नाही. मात्र, आज सहा विद्यार्थ्यांना लस दिल्यानंतर उलट्यांचा त्रास झाला. या विद्यार्थ्यांनी लस घेण्यापूर्वी काही खाल्ले नसल्याने किंवा वासामुळे त्यांना त्रास झाला आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू असून पुढील तासाभरात त्यांना घरी सोडले जाईल, असे त्यांनी सांगितले.