आपले पुस्तक क्रमिक पाठय़पुस्तक म्हणून, संदर्भासाठी लावण्यात यावे यासाठी विद्यापीठांमधील प्राध्यापकांची स्पर्धा, त्यातून होणारे व्यवहार, हे काही नवे नाही. आता या स्पर्धेत मोठय़ा प्रमाणावर वाढ होणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने कला आणि भाषा विषयांसाठी तयार केलेल्या एपीआयच्या नव्या निकषांनुसार आता पाठपुस्तके असल्यास त्याचे प्राध्यापकांना स्वतंत्र गुण मिळणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने एपीआयचे म्हणजेच प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठीच्या आणि वेतनवाढीसाठीचे पात्रतेचे सुधारित निकष गेल्या वर्षीपासून लागू केले. या निकषांनुसार प्राध्यापकांनी संशोधनावर किती भर दिला, त्यांचे किती शोधनिबंध प्रसिद्ध झाले अशा विविध मुद्दय़ांचा विचार प्राध्यापकांना पदोन्नती देताना करण्यात येतो. त्यानुसार भाषा आणि कला शाखेचे सुधारित निकष विद्यापीठानेही लागू केले आहेत. या निकषांनुसार भाषा विषयाच्या प्राध्यापकांच्या एखाद्या पुस्तकाला अभ्यासमंडळाकडून क्रमिक पाठय़पुस्तक म्हणून मान्यता मिळाल्यास त्याचे गुण एपीआयसाठी गृहीत धरण्यात येणार आहेत. आपले पुस्तक पाठय़पुस्तक म्हणून लावण्यात यावे, यासाठी विद्यापीठात घडणाऱ्या राजकारणाच्या चर्चा सर्वश्रुत आहेत. त्यामुळे येत्या काळात आपली पुस्तके पाठय़पुस्तक म्हणून लावण्यात यावीत यासाठीची स्पर्धा आणि त्या अनुषंगाने घडणारे व्यवहार येत्या काळात विद्यापीठांत रंगण्याची चर्चा प्राध्यापकांमध्येच आहे. पाठय़पुस्तकाप्रमाणेच संदर्भ पुस्तिका, कोणत्याही राज्यपातळीवरील प्रकाशनानेही प्रकाशित केलेल्या पुस्तकांनाही एपीआयसाठी गुण देण्यात येणार आहेत. विविध समारंभांमधील व्याख्याने, चर्चासत्रे यांमधील सहभागालाही गुण देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कला शाखेअंतर्गत येणाऱ्या मानसनीती, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांमध्येही थोडीशी कुरबुर आहे. एकदा पुस्तक क्रमिक पाठय़पुस्तक म्हणून लावल्यानंतर त्याचा लाभ शिक्षकांना पुढील काही वर्षे मिळू शकतो, अशीही कुरबुर सुरू आहे.
प्रायोगिक कला विभागासाठीही एपीआयचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमधील सादरीकरण, पुस्तके, शोधनिबंध यांना गुण देण्यात आले आहेत. कला क्षेत्रातील मानाचे पुरस्कार यांनाही गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, कार्यक्रम यांचे प्रमाण वाढण्याची चर्चा सुरू आहे.

Story img Loader