व्यावसायिक नटासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यामुळे यश मिळाले तरी त्याने अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनतर्फे आयोजित विक्रम गोखले यांच्या चार दिवसांच्या कार्यशाळेला गुरुवारी सुरुवात झाली. अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विक्रम गोखले यांचा ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, सदस्य किरण शाळिग्राम आणि स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत गोखले या प्रसंगी उपस्थित होते.
विक्रम गोखले म्हणाले,‘‘अभिनयाचा दर्जा घसरला असे म्हणता येणार नाही. एकदा अभिनय हाच व्यवसाय करायचे ठरविल्यानंतर नटाला वेळेची कमतरता भासू लागते. शारीरिक क्षमतेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे अभिनयाच्या प्रांतामध्ये यशाचे शिखर गाठले असले तरी व्यावसायिक नटाने अभ्यासासाठी वेळ हा काढलाच पाहिजे. या कार्यशाळेच्या माध्यमातून हातचे काही राखून न ठेवता भरभरून देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी कलाकार होतील की नाही हे सांगता येत नाही; पण विचारी माणूस म्हणून ते नक्कीच घडतील हा विश्वास आहे.’’
नोकरी करणे माझ्या तत्त्वामध्ये बसण्याजोगे नव्हते. त्यामुळे अभिनय हाच प्रांत निश्चित करण्याचे ठरविले. राजदत्त यांचे बोट धरून मी चित्रपटात आलो. वडीलधाऱ्यांनी आपण शिकविलेल्या कलेची प्रगती पाहायची असते. माझ्यासाठी राजदत्त हे त्यापैकी एक आहेत, अशा शब्दांत विक्रम गोखले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
राजदत्त म्हणाले, ‘‘नाव, पैसा मिळण्याच्या हेतूने चित्रपटसृष्टीमध्ये येऊ नका. या क्षेत्रातून आपल्याला समाजाला काय देता येईल याचा विचार केला पाहिजे. समाजमन घडविण्याचे कार्य विक्रम गोखले यांनी केले आहे. कलाकार हा सतत शिकत असतो आणि या शिकण्यातूनच तो घडत असतो.’’ किरण शाळिग्राम यांनी मनोगत व्यक्त केले. इन्स्टिटय़ूटचे संचालक गिरीश केमकर यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader