व्यवसाय तेजीत, पण सुविधांची बोंब; मनमानी शुल्काने विद्यार्थी जेरीस
‘स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे सर्वात मोठे केंद्र’ अशी नवी ओळख मिरवणाऱ्या पुण्यात अभ्यासिकांचे मोठे जाळे तयार झाले आहे. मात्र कोणतेही र्निबध नसलेल्या आणि कोटय़वधी रुपयांची उलाढाल असलेल्या अभ्यासिकांच्या व्यवसायातील मनमानीने सर्वानाच जेरीस आणले आहे. मनमानी शुल्क आकारून असुविधांना तोंड द्यावे लागते म्हणून विद्यार्थी नाराज आहेत, तर कशाही कुठेही सुरू झालेल्या अभ्यासिकांमुळे नागरिकही त्रस्त आहेत. शांतपणे अभ्यास करता येईल अशा आशेने हजारो रुपयांचे शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकांच्या मनमानीलाच सामोरे जावे लागत आहे. या नव्या व्यवसायातील उलाढाल मोठी असूनही ही बाजारपेठही अर्निबधच आहे.
राज्यात केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग यांसह इतर स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा देणारे सर्वाधिक विद्यार्थी पुण्यात असतात. गेल्या दहा वर्षांत पुणे हे स्पर्धापरीक्षांच्या तयारीचे राज्यातील मोठे केंद्र बनले आहे. फक्त स्पर्धा परीक्षांच्या बाजारपेठेचा विचार केला तरी शिकवण्या, राहणे, अभ्यासिका, अभ्यास साहित्य, विद्यार्थ्यांचे इतर खर्च असे मिळून हा आकडा शंभर कोटी रुपयांच्या घरात जातो. या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अभ्यासिका. महाविद्यालय आणि शिकवण्या सांभाळून शांतपणे अभ्यास करता यावा यासाठी हजारो रुपयांचे शुल्क भरून विद्यार्थी अभ्यासिकांचे सदस्य होतात. मात्र बहुतेकांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे दिसत आहे. बहुतेकवेळा अभ्यासिकेच्या मालकांची मनमानीच विद्यार्थ्यांना सहन करावी लागते.