पुणे विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर जाहीर न झाल्यामुळे एका तरुणाने शनिवारी परीक्षा विभागासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.
पुणे विद्यापीठाच्या विविध शाखांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अजून खोळंबले आहेत. विधी शाखेचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे सोशालिस्ट युवजन सभेचा कार्यकर्ता मनोज माने याने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोज याने सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास परीक्षा विभागासमोर थोडेसे फिनाईल प्यायले. परीक्षा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याच्या जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मनोज हा विद्यापीठाचा विद्यार्थी नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले, ‘‘हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. मनोज याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेला नाही. त्याने या पूर्वी कधीही विद्यापीठाच्या प्रशासनाशी संपर्क साधून त्याच्या अडचणी सांगितल्या नव्हत्या.’’ विधी शाखेची परीक्षा १६ एप्रिलपासून सुरू होणार असून त्यापूर्वी पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. बाळासाहेब नाईक यांनी सांगितले.
सोशालिस्ट युवजन सभेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी सांगितले, ‘‘मनोज हा आमच्या संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्याने अवलंबलेला मार्ग चुकीचा आहे. मात्र, त्याचवेळी त्यामागची भावना समजून घेणेही आवश्यक आहे.’’