दस्तनोंदणीची कामे होऊ न शकल्याने नागरिकांना मनस्ताप
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील २० दुय्यम निबंधक कार्यालये मंगळवारी बंद ठेवण्यात आली. परिणामी, दस्तनोंदणीची कामे होऊ न शकल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
लोकसभा निवडणुकांसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक केंद्राध्यक्ष या पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणुकांच्या कामकाजाचे प्रशिक्षण मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील २८ पैकी तब्बल २० दुय्यम निबंधक कार्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना याबाबतची माहिती व्हावी, यासाठी कार्यालयाच्या दर्शनी भागात सूचना लावण्याचे आदेश या विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार या सूचना लावून २० कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे लागले.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून दस्तनोंदणीच्या कामात सातत्याने अडथळे येत होते. त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे कामकाज हे केंद्रीय साठवणूक प्रणालीनुसार (सेंट्रलाइज डाटा स्टोरेज सिस्टिम -क्लाउड) १ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. या प्रणालीचे कामकाज पाहणाऱ्या ईएसडीएस कंपनीचे कार्यालय नवी मुंबईतील महापे येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात असून, या ठिकाणी सातत्याने खोदकाम सुरू असल्याने ऑप्टिकल फायबर केबल तुटण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळेही दस्तनोंदणीत अडथळे येत होते. याबाबत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न त्यांना फैलावर घेतल्यावर कामकाजात सुधारणा झाली. मात्र, आता निवडणुकीच्या कामकाजामुळे दुय्यम निबंधक कार्यालये बंद ठेवल्याने नागरिकांना त्रास झाला.
परिपत्रकानुसार कार्यालये सुरूच हवीत..
राज्य सरकारच्या १९९६ च्या परिपत्रकानुसार नागरिकांशी संबंधित असलेली आणि महसूल जमा होणारी कार्यालये बंद ठेवता येत नाहीत. मात्र, मंगळवारी शहरातील २० दुय्यम निबंधक कार्यालये ही निवडणुकीच्या कामकाजासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दस्त नोंदणीची कामे होऊ शकली नाहीत, असे अॅड. अमोल काजळे पाटील म्हणाले.