पुणे : महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. याचवेळी महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याची तयारी केली आहे. महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा महापालिकेला सहा महिन्यांपूर्वी सादर केला. महापालिकेकडून यासंदर्भात महामेट्रोसोबत आतापर्यंत तीन ते चार बैठका घेण्यात आल्या आहेत; परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी महामेट्रोने मागील वर्षीच केली होती. दुसऱ्या टप्प्यात पुण्यात ४३ किलोमीटर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. मेट्रोचा पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांत एकूण दोनशे किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभे राहणार आहे. दुसरा टप्पा पूर्णत्वास गेल्यानंतर शहरातील कोणत्याही भागात मेट्रोने जाणे शक्य होणार आहे.
हेही वाचा – एनएमएमएस शिष्यवृत्तीची निवड यादी जाहीर
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा २६ सप्टेंबर २०२२ रोजी महामेट्रोने पुणे महापालिकेकडे सादर केला होता. यानंतर महापालिकेने त्यात काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यासंदर्भात महामेट्रो आणि महापालिका यांच्यात तीन ते चार बैठका झाल्या. प्रकल्प विकास आराखडा सादर करूनही महापालिकेने पुढील कार्यवाही केलेली नाही. प्रत्यक्षात महापालिकेने प्रकल्प विकास आराखडा मंजूर करून तातडीने राज्य सरकारकडे पाठवायला हवा होता. त्यानंतर राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवला असता आणि अंतिम मंजुरी मिळाली असती. परंतु, सहा महिने झाले तरी प्रकल्प विकास आराखडा महापालिकेतून पुढे सरकलाच नाही. महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर हा आराखडा पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणासमोर (पुम्टा) मांडला जाणार आहे, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सध्या मेट्रोचा प्रवास कुठपर्यंत?
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा ३३ किलोमीटरचा आहे. त्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो सध्या धावत आहे. आता लवकरच गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल आणि फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या मार्गांवरील कामे पूर्ण होत आली असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी करून हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गांवर मेट्रो धावेल. हे मार्ग सुरू झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड मेट्रोद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहेत.
हेही वाचा – देशभरात रेल्वे गाड्यांमध्ये दर दोन दिवसांनी होतेय एक प्रसूती
दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचे जाळे
- वनाज ते चांदणी चौक
- रामवाडी ते वाघोली
- हडपसर ते खराडी
- खडकवासला ते स्वारगेट
- एसएनडीटी ते वारजे
- पिंपरी-चिंचवडमध्ये उच्च क्षमता सार्वजनिक वाहतूक मार्ग
महापालिकेकडे आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा सादर केला. त्यांनी डिसेंबर, जानेवारीमध्ये केलेल्या सूचनांनुसार त्यात सुधारणा केल्या आहेत. महामेट्रो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रकल्पाच्या ठिकाणांची पाहणीही केली आहे. महापालिकेकडून या आराखड्यावर प्रक्रिया सुरू आहे, असे महामेट्रो, संचालक, अतुल गाडगीळ म्हणाले.