प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना पालक आणि विद्यार्थ्यी म्हणून आपण सर्वांनी वैयक्तिक विकासाच्या मागे धावाताना लायकी नसणारा राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम दिलं आहे, असं परखड मत व्यक्त केलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यातिथीनिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलताना सुबोध भावेने हे मत व्यक्त केलं.
‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. सुबोधच्या उपस्थितीत ही २५० विद्यार्थ्यांचा सहभाग असणारी नाटिका सादर करण्यात आली. यावेळी बोलताना सुबोधने सध्याच्या शिक्षण पद्धतीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. “आपण सर्वजण चांगलं शिक्षण घेऊन करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशात जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत,” असं सुबोधने आपल्या भाषणात म्हटलं. या अशा विचारसणीमुळे “ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे,” अशी खंत सुबोधने व्यक्त केली. देश निर्मितीसाठी पुढील पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, असंही सुबोधने यावेळी भविष्यातील शिक्षण पद्धतीकडून असणाऱ्या अपेक्षांबद्दल म्हटलं.
“राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही. ते काय करतात, हे आपल्या समोर आहेच,” असं म्हणत सुबोधने सध्याच्या परिस्थिती संदर्भात अप्रत्यपणे नाराजी व्यक्त केली. “यासाठीच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभे करणे आवश्यक आहे,” असं मत सुबोधने व्यक्त केलं. “इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावे, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच ‘मुंबई महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले तर पैसेच राहणार नाहीत’ अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात,” असं म्हणत सुबोधने राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
“हल्ली आपण मुलांना हिंदी, मराठी गाण्यांवर नाचायला सांगतो. एखाद्या चित्रपटातील संवाद त्यांना सर्वांसमोर सादर करायला सांगतो. पुष्पा चित्रपटातील संवादांच्या सादरीकरणाचे तर खूळ आले आहे. हे करून देश घडणार नाही. याऐवजी जर या मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले, तर त्यांच्यात देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल,” असा विश्वास सुबोधने व्यक्त केला.
या कार्यक्रमाला ‘डीईएस’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ, शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाहक धनंजय कुलकर्णी, मुख्याधापिका मधुरी बर्वे, प्रकाश पारखी, डॉ. राहुल देशपांडे उपस्थित होते.