पुणे : समान पाणीपुरवठा, जायका प्रकल्प, नदी सुधार योजना, मेट्रो, उड्डाणपुलांची उभारणी या भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करून भारतीय जनता पक्षाच्या ‘संकल्पा’ला आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी ‘सिद्धी’पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकात महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यास प्राधान्य दिले असून फेब्रुवारी २०१४ पर्यंत समान पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. समान पाणीपुरवठा, जायका, नदी सुधार योजना, मेट्रो आदी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. या योजना वर्षभरात पूर्ण करण्याचा मानस अंदजापत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे.
नदीपात्रात थेट जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी जपान स्थित जायका कंपनीकडून महापालिकेला अनुदान मिळाले आहे. या प्रकल्पाचे पन्नास टक्के काम आगामी वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण योजनेअंतर्गत ४४ किलोमीटर लांबीच्या मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची एकूण ११ भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यानचे काम सुरू झाले असून बंडगार्डन पूल ते मुंढवा हा नदीकाठचा रस्ता सार्वजनिक खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. वाकड बाह्यवळण ते सांगवी या कामासाठी ६२४ कोटींचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे. याशिवाय ग्रेड सेप्रेटर आणि उड्डाणपुलांची उभारणीलाही गती देण्यात येणार असून मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीत मार्गाबरोबर मेट्रोच्या कामासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, आयुक्तांचे अंदाजपत्रक शहर विकासाला चालना देणारे आहे. भाजपाने केलेल्या मागणीनुसार महापालिका आयुक्तांनी मिळकतकरात वाढ प्रस्तावित केलेली नाही. मेट्रो, नदी शुद्धीकरण आणि सुशोभीकरण, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालयासाठी तरतूद, उड्डाणपुलांच्या उभारणीला आणि रस्ते विकासनाला प्राधान्य देण्यात आले आहे. ही सर्व कामे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात सुरू झाली आहेत. त्यामुळे विकसकामे पूर्ण होण्यास अंदाजपत्रकामुळे गती मिळणार आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.
हेही वाचा – पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात उड्डाणपूल, पीपीपीवरील रस्ते उभारणीला प्राधान्य
महापालिकेचे अंदाजपत्रक निराशाजनक आणि अवास्तव आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेला अपेक्षित उत्पन्न गाठता आलेले नाही. अंदाजपत्रक तीन हजार कोटींच्या तुटीचे आहे. भाजपाच्या पाच वर्षांच्या काळात महापालिकेची झालेली घसरण लपविण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकातून करण्यात आला आहे. अंदाजपत्रक फसले असून भाजपाच्या दबावाखाली अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.