महापालिकेने जबाबदारी झटकली

पुणे : स्वारगेट येथील भुयारी मार्गात महापालिकेच्या सदोष जलवाहिन्यांमधून सातत्याने पाण्याची गळती होत आहे. हे गळती होणारे पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पावसाळी गटाराची झाकणेही वारंवार चोरीला जात आहेत. परिणामी या मार्गातून जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) बोट दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात हा मार्ग  एमएसआरडीसीने महापालिकेकडे २०१७ मध्येच हस्तांतरित केला आहे.

शंकरशेठ रस्त्यावर पीएमपीच्या इमारतीसमोर भुयारी मार्गाला सुरुवात होते. तो पं. नेहरू स्टेडियमपर्यंत आहे. हा भुयारी मार्ग साडेपाचशे मीटर लांबीचा असून त्याची रुंदी साडेसात मीटर आहे. या मार्गासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च आला आहे. जेधे चौकातील सातारा रस्ता ते शंकरशेठ रस्ता आणि नेहरू स्टेडियम रस्तादरम्यान असलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केल्यानंतर भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

दरम्यान, भुयारी मार्गाच्या भिंतीवरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे तयार करण्यात आली आहेत. त्यावरील लोखंडी झाकणे वारंवार चोरीला जात आहेत. महापालिकेकडून याबाबत कार्यवाही अपेक्षित असताना देखील एमएसआरडीसीने या मार्गाच्या कंत्राटदाराकडून वेळोवेळी लोखंडी झाकणे बसवून घेतली आहेत. मात्र, सातत्याने ही लोखंडी झाकणे चोरीला जात आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना अपघात होण्याची शक्यता आहे.

‘एमएसआरडीसीकडून भुयारी मार्ग तयार करण्यात आला असून, हा मार्ग १५ मे १०१७ रोजी पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासह इतर सर्व कामे महापालिकेने करणे अपेक्षित आहे’, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता पी. एस. औटी यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ला दिली.

पाणी गळतीचा आणखी एक नमुना

भुयारी मार्ग तयार करताना महापालिकेच्या सदोष जलवाहिन्या आणि भूगर्भातील एका जिवंत पाण्याच्या झऱ्यामधून पाण्याची गळती होत होती. या सदोष जलवाहिन्या तातडीने दुरुस्त करण्याबाबत एमएसआरडीसीकडून महापालिकेला कळवण्यात आले होते. मात्र, महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. पाणी झिरपून भुयारी मार्गाची भिंत कोसळण्याचा धोका ओळखून वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरून मार्गाची भिंत उभी करण्यात आली आहे. तर, भिंतीवरून झिरपणारे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे तयार करण्यात आली आहेत. हा मार्ग संपल्यानंतर त्यालाच स्वतंत्र मोठी जलवाहिनी (स्टॉर्म वॉटर लाईन) जोडून ते पाणी सारसबागेकडे वळवण्यात आले आहे. त्यामुळे सारसबागेतील झाडांसाठी, तळ्यात सोडण्यासाठी आणि इतर वापरासाठी हे पाणी उपयोगी पडत आहे.

Story img Loader