लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: चालकाचा ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅसवाहू टँकर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निगडीत पलटी झाल्याने गॅस गळती झाली. टँकरमध्ये तब्बल १८ हजार किलो गॅसचा साठा असल्याने आणि भर वस्तीत ही दुर्घटना घडल्याने पुढील धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून घटनास्थळापासून ३०० मीटर पर्यंतचा परिसर पूर्णपणे बंद केला होता. सायंकाळी साडेपाच वाजता गॅस गळती पूर्णपणे थांबविण्यात यश आले.

या अपघातात टँकर चालक राजेंद्र कुमार यादव हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस आणि बीपीसीएल पथकाच्या अथक परिश्रमामुळे कोणतीही जिवीत वा वित्तहानी न होता गळती थांबविण्यात यश आले. भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅसवाहू टँकर मुंबईहून सोलापूरकडे जात होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती पुलाजवळ टँकर येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टँकर पलटी झाला.

आणखी वाचा-पिंपरी महापालिका आयुक्तांकडून आकसातून कारवाई; उपायुक्त स्मिता झगडे यांचे स्पष्टीकरण

यावेळी झालेल्या प्रचंड मोठ्या आवाजाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. टँकरच्या केबिनमध्ये चालक यादव हे अडकले होते. नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रूग्णालयात हलविले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीसांसह महापालिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग, भारत पेट्रोलियमचे पथकही दाखल झाले. टँकरमध्ये तब्बल १८ टन गॅस असल्याने आणि लिक्वीड गॅस रस्त्यावर सांडला असल्याने खबरदारी म्हणून पोलीसांनी घटनास्थळापासून ३०० मीटर पर्यंतचा परिसर पूर्णपणे बंद केला.

परिसरातील वाहतुकही बंद करण्यात आली. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकही रूपीनगर आणि निगडी – ट्रान्सपोर्टनगर येथून वळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब, पाच क्रेन, एक रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली. अग्निशमन जवानांकडून गॅस पसरू नये यासाठी सातत्याने पाण्याचा मारा करण्यात येत होता. बीपीसीएल कंपनीमार्फत अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसर्‍या टँकरमध्ये भरण्यासाठी टँकर मागविण्यात आला. त्यानंतर मशीनद्वारे अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसर्‍या टँकरमध्ये भरण्यात आला. दुपारी अडीचच्या सुमारास चार क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकर सरळ उभा करण्यात आला. मात्र, गॅस गळती होत असल्याने ती थांबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरूच होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गॅस गळती पूर्णपणे थांबविण्यात यश आले.