प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ, पर्वती
नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप आणि शिवसेनेतच सामना रंगणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांचे सध्याचे प्रभाग एकत्र होऊन नव्याने हा प्रभाग तयार झाल्यामुळे विद्यमान नगरसेवकांपुढील अडचणीही वाढल्या आहेत. या दोन्ही पक्षांची युती न झाल्यास शिवसेना कोणती व्यूहरचना आखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुणे-सातारा रस्त्यापासून नव्या पेठतील टिळक चौकापर्यंत असा हा प्रभाग नव्याने अस्तित्वात आला आहे. जुना प्रभाग क्रमांक ५७, ५१ मधील काही भाग आणि प्रभाग क्रमांक ५२ चा जवळपास अर्धा भाग नवी पेठ-पर्वती हा प्रभाग करताना त्यात समाविष्ट करण्यात आला. या प्रभागात भाजपचे तीन, तर शिवसेनेचे एक विद्यमान नगरसेवक आहेत. प्रभागाची फेररचनाही भाजपला काही प्रमाणात अनुकूल राहील अशीच आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ, भाजपचे धनंजय जाधव, स्मिता वस्ते आणि मनीषा घाटे या भागातून विजयी झाल्या. दत्तवाडीमधील काही भाग या प्रभागाला जोडण्यात आला असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या काही भागाचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग तुलनेने कमी असल्यामुळे भाजप आणि सेनेमध्येच लढत होईल, हे सध्या तरी स्पष्ट आहे. पण हे सारे युतीवरच अवलंबून राहणार आहे.
पर्वती गावठाण, पर्वती दर्शन वसाहत, अलका चित्रपटगृह, पूना हॉस्पिटल, राजेंद्रनगर, कलाश्री, रक्षालेखा
सोसायटी, दत्तवाडी, टिळक स्मारक मंदिर, स. प. महाविद्यालय, नवी पेठ, लोकमान्यनगर, अंबिल ओढा वसाहत, लक्ष्मीनगर या भागांचा या प्रभागात समावेश आहे. प्रभागातील नवीन आरक्षणानुसार महिला राखीव, सर्वसाधारण पुरुष राखीव आणि अनुसूचित जाती महिला अशी आरक्षणाची परिस्थिती आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान नगरसेवक धनंजय जाधव अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र आता आरक्षण बदलल्यामुळे धनंजय जाधव यांची कोंडी झाली आहे. कोणत्या प्रवर्गातून निवडणूक लढवायची हा त्यांच्यापुढील प्रश्न असून त्यांनी खुल्या गटातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याची चर्चा आहे, तर खुल्या जागेवरून उमेदवारी न मिळाल्यास महिलांसाठीच्या खुल्या जागेवरून पत्नी जयश्री यांना उमेदवारी मिळविण्यासाठीची मोच्रेबांधणीही त्यांनी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
भाजपची उमेदवारी कुणाला?
शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांच्यासाठी हा प्रभाग काहीसा अडचणीचा ठरणार असला तरी याच प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे. हरणावळ यांच्या बरोबर अन्य कोण उमेदवार असतील, याचीही शिवसेनेला शोधाशोध करावी लागणार आहे. प्रभागात मनसेची ताकद वाढत असली तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला त्यांच्याकडून टक्कर मिळेल, अशी सध्याची अजिबात परिस्थिती नाही. सध्याची परिस्थिती बघता भाजपची प्रभागात निश्तिच ताकद आहे. इच्छुकांची संख्याही भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत झाली, तर हे उमेदवार निकालावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. मात्र भाजपमधील कोणाला उमेदवारी मिळणार, यावरच सर्व गणिते अलवंबून राहणार आहेत.