लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था यांच्यातर्फे आयोजित ‘ऑल इंडिया चिल्ड्रन्स एज्युकेशनल ई-कंटेंट कॉम्पिटिशन’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी ई शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत यश मिळवले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे विभागप्रमुख डॉ. योगेश सोनवणे यांच्यासह पालघर येथील पंकज नरवाडे, शेवगाव येथील उमेश घेवरीकर हे शिक्षक, तर पुण्यातील अविना मयूर शिंदे, नाशिक येथील करण सुनार, नांदेड येथील शौर्य केंद्रे यांचे ई साहित्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.

दर वर्षी शिक्षण क्षेत्रात अभिनव ई-साहित्य निर्मिती आणि त्या साहित्याचा अध्ययन-अध्यापनात प्रभावी वापर करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था यांच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थेतर्फे स्पर्धा आयोजित केली जाते. त्यात श्राव्य, दृक्-श्राव्य आणि आभासी आशयाचा समावेश असतो.

पुरस्कारप्राप्त ई साहित्य २६ ते २८ मार्च दरम्यान मेघालयमधील शिलाँग येथे होत असलेल्या नॅशनल ‘आयसिटी मेला’मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व असणार आहे. त्यात सोनवणे यांची शैक्षणिक पाठावर आधारित दृक्-श्राव्य चित्रफीत, घेवरीकर यांचा प्रौढ शिक्षणावरील लघुपट, तर अविना शिंदे, करण सुनार आणि शौर्य केंद्रे यांच्या अध्ययन साहित्याची निवड झाली आहे. अविना हिला मृणाल गांजाले यांनी, करणला कुंदा बच्छाव, तर शौर्य याला संतोष केंद्रे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

शिक्षणात आधुनिक तंत्राचा अंतर्भाव करत ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षण पोचवण्याचे काम राज्यातील अनेक तंत्रस्नेही शिक्षक तळमळीने करत आहेत. त्यांच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने ही चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्यास बळ मिळणार आहे, असे डॉ. सोनवणे यांनी नमूद केले.