शिरूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना अथक परिश्रमांसह अनेकदा प्रयत्न करावे लागतात. मात्र, शिरुरच्या डॉ. मानसी साकोरे यांनी एक-दोनदा नाही, तर तब्बल तीन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांना राष्ट्रीय स्तरावर ४५४वा क्रमांक मिळाला असून, यूपीएससीची परीक्षा तीनवेळा उत्तीर्ण होणाऱ्या डॉ. मानसी शिरूर तालुक्यातील पहिली महिला ठरल्या आहेत.
डॉ. मानसी या शिरूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते अर्जुन शेटे यांची नात आहेत. तर डॉ. मानसी यांचे वडील नानाभाऊ साकोरे सैन्यदलातून वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात मानसी यांना ५६३वा, दुसऱ्या प्रयत्नात ५३१वा क्रमांक मिळाला होता. आयपीएस म्हणून निवड झालेली असताना त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी तिसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यात त्यांना ४५४वा क्रमांक मिळाला. मानसी यांचे प्राथमिक शिक्षण शिरूर नगर परिषदेच्या मराठी सेंटर शाळेत, तर विद्याधाम प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (बीडीएस) पूर्ण केला.
समाजाची सेवा करता येईल प्रशासनात जाण्याचे ठरवून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याचे सांगून डॉ. मानसी म्हणाल्या, ग्रामीण भागातील आणि मराठी माध्यमात शिक्षण घेतलेली मुले ही केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेत यश मिळवू शकतात. मोठे स्वप्न पाहण्याची इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी असल्यास यश नक्कीच मिळते. यश मिळवण्यासाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्लॅन बी असणेही आवश्यक आहे.
मला डॉक्टर होता आले नाही, मात्र, तीनही मुलांनी डॉक्टर होऊन ते स्वप्न साकार झाले. सैन्यातील नोकरीमुळे घरापासून दूर असताना पत्नी रंजना यांनी मुलांचे करिअर घडवण्यात मोठे योगदान दिल्याची भावना नानाभाऊ साकोरे यांनी व्यक्त केली.