बारामती : एकरी २ लाख रुपये खर्च करायचा आणि ७.५ एकरात वर्षाला ५० ते ६० लाख घ्यायचे, ही अशक्य वाटणारी गोष्ट व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर शक्य आहे. बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगर येथील निंबूतच्या दीपक जगताप या शेतकऱ्याने हे दाखवून दिले आहे. माळरानावर या बळीराजानं जिद्दीने अंजीर पिकविल्याने त्यांना ‘लक्ष्मी’चे दर्शन घडले आहे.
जे विकते ते पिकवण्याकडे आता शेतकऱ्यांचा कल झाला आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीच्या माध्यमातून वेगवेगळी पिके घेऊ लागले आहेत. अंजीर म्हटले की, पुरंदर तालुका समोर येतो. मात्र, बारामतीत खडकाळ माळरानावर जगताप कुटुंबाने १० एकरवर अंजीर पिकवले आहेत. जगताप यांचे ८ जणांचे कुटुंब आहे. त्यांची जमीन टेकडीवरील माळरानावरची असून, ६ एकर शेती ही पडीक अशा स्वरूपाची होती. पिकाऊ शेतीत उसाचे पीक घ्यायचे आणि अन्य जमिनीवर पाण्याच्या भरवशावर कडधान्य किंवा भुसार पिके घेतली जात होती. मात्र, त्यांनी २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वीर धरणाच्या कालव्याजवळ विहीर खोदली आणि त्या विहिरीतून माळरानावर पाणी आणले. हा साधारणपणे १८ वर्षापूर्वीचा काळ. सन २००६ मध्ये त्यावेळी त्यांनी सुरुवातीला प्रत्येकी एक एकरावर संत्रा, मोसंबी, डाळिंब आणि अंजीर ही चार पिके घेण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला उत्साह चांगला होता. मात्र, कालांतराने बाजार भाव न मिळाल्याने इतर फळपिके बाजारभाव प्रतिकूल झाल्याने काढावी लागली. संत्री आणि मोसंबीची बाग काढण्यात आली. डाळिंबाचे उत्पादन चांगले मिळाले, दरही चांगला मिळाला. मात्र, तेल्या रोगाने आणि मर रोगाने डाळिंबाची अवस्था वाईट केली. या सगळ्या परिस्थितीत उरलेली डाळिंबाची देखील बाग काढावी लागली. मात्र, अंजिराने त्यांचे नशीब पालटून टाकले.
सुरुवातीला ४ ते ५ वर्षे अंजीर पिकातून उत्पन्न मिळत नव्हते. मात्र, अंजिरावर प्रयोग करून पाहू, असा विचार करून दीपक जगताप यांनी पुन्हा नेटाने प्रयत्न चालू ठेवले. अंजिराच्या उत्पादनाचे वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी त्यांनी वेळही खर्च केला. वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बागांना भेट दिली. नेमके काय चुकते आहे ते समजून घेतले. खताचे, औषधांचे, छाटणीचे व्यवस्थापन कसे करावे, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि अखेर त्यांना यश मिळाले. याच काळात पुण्यात नोकरीला असलेले दीपक जगताप यांचे भाऊ गणेश हे २०१७ मध्ये पुण्यातील नोकरी सोडून शेतीकडे आले. या दरम्यान अंजिराला महत्त्व येऊ लागले त्यांचे अंजीर उच्च गुणवत्तेचे उत्पादित होऊ लागले. खट्टा आणि मीठा असे दोन्ही बहर ते घेऊ लागले. त्याचे मार्केटिंग मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद, सुरत, बंगलोर अशा ठिकाणी करू लागले, त्यातून त्यांना उत्पन्न देखील चांगले मिळू लागले.
एका एकरावर तयार केलेली अंजिराची बाग त्यांच्यासाठी लक्ष्मीचे वरदान ठरली. आज ती ७.५ एकरावर पोचली आहे. त्यांच्या शेतात या शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी १५ ते २० मजुरांना रोजगार देखील उपलब्ध झाला. आता जगताप यांच्या ७.५ एकर जमिनीवरील अंजीर हे नऊ महिने म्हणजे ऑक्टोबर ते जुलै या कालावधीत तोडणीसाठी कायम उपलब्ध असते. या अंजिराच्या बागेतून पुढील ३० वर्ष उत्पादन मिळू शकेल, असा त्यांचा दावा आहे. साधारणपणे ५० ते ६० लाखांपर्यंत जगताप कुटुंबाच्या अंजिराची दरवर्षाची उलाढाल आहे.
खडकाळ माळरानावर अंजीर लावण्याचा प्रयोग केला. त्यासाठी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बागांना भेट दिली. नेमके काय चुकते आहे ते समजून घेतले. खताचे, औषधांचे, छाटणीचे व्यवस्थापन कसे करावे, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाले. अंजिराच्या बागेतून पुढील ३० वर्षे उत्पादन मिळू शकेल.
दीपक जगपात, प्रगतीशील शेतकरी