रमणा दुम्पालाचा माहितीपट फ्रान्समधील महोत्सवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या मध्यवर्ती भागात राहूनही विजेचा वापर न करणाऱ्या, काँक्रिटचे जंगल भवताली असूनही झाडा-झुडपांच्या सहवासात राहण्यास प्राधान्य देणाऱ्या ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. हेमा साने यांच्यावर आधारित ग्लो वॉर्म इ जंगल हा माहितीपट तयार झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) टीव्ही डिरेक्शन विभागाचा विद्यार्थी रमणा दुम्पला याने हा माहितीपट दिग्दर्शित केला असून, या माहितीपट फ्रान्समधील महोत्सवासाठी निवडला गेला आहे.

फ्रान्समधील पॉइटर्स फिल्म फेस्टिव्हलसाठी एफटीआयआयच्या दोन लघुपटांची निवड झाली. रमणा दुम्पलाच्या ग्लो वॉर्म इ जंगल या माहितीपटासह मैसम अली दिग्दर्शित देर शाम तक या लघुपटाचीही निवड झाली. प्रा. हेमा साने गरवारे महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत. पर्यावरणाविषयी अत्यंत सजग असलेल्या साने यांनी आजपर्यंत विजेचा वापर केलेला नाही. या माहितीपटातून साने यांची आजच्या काळात अनोखी ठरणारी जीवनशैली आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे.

‘माहितीपटाच्या प्रकल्पासाठी विषय शोधत होतो. १०-१५ विषयांचा अभ्यास केला. मात्र, त्यातून काही विशेष हाती येत नव्हते. अखेर, पुण्यात राहूनही विजेचा वापर न करणाऱ्या प्रा. हेमा साने यांच्याविषयी कळले. त्यांच्याविषयीची प्राथमिक माहिती घेण्यासाठी बराच शोध घेतला. त्या जोगेश्वरी मंदिराजवळ राहत असल्याचे कळले. मात्र, मी मूळचा हैदराबादचा असल्याने मला पुण्याविषयी विशेष माहिती नव्हती. त्यामुळे मराठी येणाऱ्या मित्राला सोबत घेऊन त्यांचे घर शोधले.

त्यांना पहिल्यांदाच भेटल्यावर त्यांच्याविषयी कळलेली माहिती आणि त्यांची जीवनशैली यातील फरक कळला. त्यांना माझ्या प्रकल्पाविषयी कल्पना दिली. सुरुवातीला त्यांनी नकारच दिला. मात्र, त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी सहकार्याची तयारी दर्शवली. त्यांच्या दिनक्रमाचे दोन दिवस चित्रीकरण केले,’ असे रमणाने सांगितले.

‘आजच्या काळात आपण तंत्रज्ञानाच्या अधीन झालेलो असताना किंवा निवृत्तीनंतर शांतनिवांत आयुष्य जगण्याचा संकल्प करत असताना डॉ. साने प्रेरणादायी आयुष्य जगत आहेत. काँक्रिटचे जंगल भवताली असूनही त्या जंगलात राहिल्यासारख्याच असतात. त्यांचे काम, जीवनशैली खरोखरच प्रेरणादायी आहे. हा माहितीपट फ्रान्समधील महोत्सवासाठी निवड झाल्याचा आनंद वाटतो,’ अशी भावनाही रमणाने व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of hema sane
Show comments