पुणे : देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी गो संशोधन व विकास प्रकल्पात पहिल्या गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे. हा प्रकल्प पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्मलेल्या कालवडीचे वजन २२.९ किलो आहे. त्याच्या मातेचे दूध एका वेतात ४१६५ लिटर आहे व फॅट ५ टक्के एवढे आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी दिली.  हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. धीरज कणखरे, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ अडांगळे तसेच ‘एनडीडीबी राहुरी सिमेन स्टेशन’चे डॉ. शिवकुमार पाटील हे काम करत आहेत. भविष्यात उच्च दर्जाच्या जलदगतीने गाई तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज असेल, असे मत कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी व्यक्त केले.

भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे काय?

उत्कृष्ट आनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगली आनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलित अंडय़ाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गाईमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळवणे.