बारामती : बारामती तालुक्यातील शेतकरी नेहमीच शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून चांगले उत्पादन घेण्यात आघाडीवर असतात. बाजारात मागणी असलेला शेतमाल पिकवावा या संकल्पनेतून कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकरी अजित पोमणे यांनी अत्याधुनिक रोपवाटिका आणि शेडनेट हाउसची उभारणी केली आहे. त्यातून ते परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध करून देत आहेत. सोबतच यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी कलिंगडाच्या शेतीच्या माध्यमातून साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळविले असून, गेल्या वर्षी भाज्यांच्या रोपांतून त्यांनी तब्बल साडेसहा लाखांचा फायदा मिळविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोमणे यांनी २०१२ पासून शेतात नव्या तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. इतर पिकांतून १८ एकरच्या शेतात मिळणारे अल्प उत्पन्न लक्षात घेता त्यांनी बागायती शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतात ऊस, कलिंगड, कांदा, वांगी, टोमॅटो ही नगदी पिके ते घेऊ लागले. या शेतीतून फायदा झाल्यामुळे सन २०१४ मध्ये तीन हजार पक्ष्यांचे दोन पोल्ट्री शेड उभे केले. या पोल्ट्री व्यवसायातूनही चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा होऊ लागला.

त्यानंतर दरवर्षी साधारणपणे ऊस दहा एकर आणि कलिंगड, वांगी, बटाटा, आले प्रत्येकी एक एकर अशी नगदी पिके ते घेऊ लागले. भाजीपाला पिकांपासून चांगला आर्थिक फायदा होऊ लागला. भाजीपाला लागवडीसाठी रोप खरेदीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागल्याने त्यांनी स्वत:चीच रोपवाटिका उभी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून १० गुंठे क्षेत्रावर अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत सिद्धिविनायक हायटेक रोपवाटिका स्थापन केली. रोपवाटिकेसाठी कृषी विभागाकडून दोन लाख ३० हजार रुपये अनुदान मिळाले.

रोपवाटिकेमध्ये कलिंगड, खरबूज, वांगी, मिरची, टोमॅटो, शेवगा व उसाच्या रोपांची निर्मिती केली जाते. ग्राहकांची गरज ओळखून परिश्रमपूर्वक नवा मार्ग स्वीकारल्याने पोमणे हे शेती व्यवसायात यशस्वी ठरले. ‘विकेल ते पिकेल’ सोबतच ‘नव्या तंत्राने पिकेल’ ही संकल्पना देखील शेतात राबविल्याने त्यांची वाटचाल आर्थिक समृद्धीकडे सुरू आहे. पोमणे हे कलिंगडाची विक्री बांधावर करत असून, यंदा कलिंगडामधून त्यांना खर्च वजा जाऊन सुमारे ३ लाख २० हजार रुपये मिळाले.

हेही वाचा : विश्लेषण : दूध उत्पादनास मदत करणारा प्रयोग… काय आहे महाराष्ट्र पशू विद्यापीठाचा कालवडनिर्मिती प्रकल्प?

मागील वर्षी भाज्यांच्या रोपांतून ६ लाख रुपये मिळाले, तर ४ लाख ५० हजार उसाची रोपे विक्रीकरून ११ लाख २५ हजार रुपये मिळाले. त्यातून खर्च वजा जाऊन त्यांना ४ लाख ५० हजार रुपयांचा नफा झाला. पोमणे हे त्यांच्या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाच्या रोपांची उत्पादने घेत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनाही स्थानिक पातळीवर दर्जेदार रोपे उपलब्ध होत आहेत. कृषी विभागाने त्यासाठी केलेले सहकार्य आणि मार्गदर्शनाचा पोमणे आवर्जून उल्लेख करतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful farming of watermelon and vegetables in baramati pune print news pbs
Show comments