गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय या २.७५ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेमध्ये मेट्रोची यशस्वी चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. येत्या काही दिवसांत या मार्गिकेवर चाचण्या घेण्यात येणार असून सर्व यंत्रणांची तपासणी चाचणी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत मेट्रो धावल्याने येत्या काही दिवसांत वनाजपासून जिल्हा न्यायालयापर्यंत मेट्रो मार्गिका सुरू होणार आहे. नव्या वर्षात या मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरू होणार आहे.
हेही वाचा >>> पुण्यात आठ टीएमसी पाण्याची गळती; पालकमंत्री पाटील यांची कबुली
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुण्यात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड एकूण ३३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकांची कामे वेगाने सुरू आहेत. यातील वनाज ते रामवाडी या मार्गिकेअंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या साडेतीन किलोमीटर अंतरात मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या टप्पा सुरू करण्याचे महामेट्रोकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात या मार्गिकेमधील गरवारे महाविदयालय ते संभाजी उद्यानापर्यंतच्या मार्गिकेत मेट्रोची चाचणी घेण्यात आली होती. त्यापुढील टप्प्यात थेट गरवारे महाविद्यालयापासून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचे पाप; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा आरोप
गरवारे महाविद्यालय स्थानकातून मेट्रो दुपारी अडीच वाजता सुटली. डेक्कन स्थानक, छत्रपती संभाजी उद्यान स्थानक, महापालिका भवन स्थानकमार्गे तीन वाजून दहा मिनिटांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयातील स्थानकात मेट्रो पोहोचल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. मेट्रो शिवाजीनगर स्थानकात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या चाचणीसाठी ट्रॅक विभाग, व्हायाडक्ट विभाग, मेट्रो स्थानक विभाग, ट्रॅक्शन विभाग, सिग्नल, टेलिकाॅम,रोलिंग स्टाॅक विभागाकडून अहोरात्र काम करण्यात आले.
गरवारे महाविद्यालय स्थानक ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय या चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानक या दरम्यान चाचणी घेण्यात येणार आहे. या दोन्ही शहरांध्ये मेट्रो स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय पथकाकडून त्याचे परीक्षण केले जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच प्रवाशांसाठी मार्ग खुले केले जातील.
गरवारे महाविद्यालय स्थानक ते सत्र न्यायालय स्थानक या दरम्यान झालेली चाचणी हा महत्त्वाचा टप्पा आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय दोन्ही मार्गिकांना जोडणारे इंटरचेंज स्थानक आहे.