पुणे : एक महिला मानदुखीने त्रस्त असल्याने तिच्या दैनंदिन कामात अनेक अडथळे येत होते. तिला चालतानाही त्रास होत होता. अखेर तपासणीत या महिलेच्या मज्जारज्जूत गाठ असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी डी वेव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून या महिलेवर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकली. यामुळे महिलेच्या मज्जारज्जूला कोणतीही इजा न होता शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिला रुग्णाचे वय ३८ आहे. ती गंभीर मानदुखीने त्रस्त होती. त्यामुळे तिला चालताना आणि दैनंदिन कामे करताना अडचणी येत होत्या. तिच्या एमआरआय स्कॅनमध्ये मज्जारज्जूच्या भागात गाठ असल्याचे निदान करण्यात आले. या गाठीच्या आकारामुळे आणि स्थानामुळे या महिलेला भविष्यातील त्रासापासून वाचविण्यासाठी ती काढून टाकणे आवश्यक होते. मात्र, ही शस्त्रक्रिया करताना धोकाही मोठा होता. शस्त्रक्रियेदरम्यान मज्जारज्जूला इजा झाल्यास हातापायाचा पक्षाघात, श्वसनयंत्रणेतील बिघाडासह मेंदूच्या कार्यावर परिणाम होण्याची भीती होती.
हेही वाचा…पुण्यात ओला, उबरचे काय होणार? जाणून घ्या कधी होणार अंतिम निर्णय…
या सर्व धोक्यांचा विचार करून डॉक्टरांनी अत्याधुनिक डी वेव्ह तंत्रज्ञान आणि कॅव्हिट्रॉन अल्ट्रासॉनिक सर्जिकल ॲस्पायरेटरचा (सीयूएसए ) वापर करण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या मज्जारज्जूतील गाठ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली. ही गाठ पूर्णत: काढून टाकल्याने भविष्यात ती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाही. महिलेला शस्त्रक्रियेनंतर कोणतीही समस्या उद्भवली नाही. तसेच तिला कोणताही अशक्तपणा जाणवला नाही. ती आता व्यवस्थितपणे आपली दैनंदिन कामे करीत आहे.
डी वेव्ह तंत्रज्ञानामुळे रुग्णाच्या शरीरात घडणारे बदल प्रत्यक्षात आम्हाला तपासता येत होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अचूकपणे आणि नियंत्रित पद्धतीने ही गाठ काढण्यात आली. यामुळे रुग्णाच्या मज्जारज्जूला दुखापत न करता शस्त्रक्रिया यशस्वीपणे करता आली. – डॉ. अमित धाकोजी, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर