पुणे : एका ६५ वर्षीय महिलेला ओटीपोटातील हर्नियाचा त्रास सुरू झाला. तिला आधीपासून दमा, उच्च रक्तदाब, तसेच मधुमेहाचाही त्रास असल्याने तिच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली. यामुळे दोन महिने या महिलेची प्रकृती स्थिर करण्यासाठी उपचार करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे उपचार करून तिला डॉक्टरांनी जीवदान दिले.
या महिलेचे वय, स्थूलता, विविध आजार, तसेच तीनदा शस्त्रक्रियेच्या मदतीने प्रसूती झालेली असल्याने हर्नियाची शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक बनले होते. रुग्णाला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून डॉक्टरांनी रोबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीने गुंतागुंतीच्या हर्नियावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेतील दा व्हिन्सी प्रणालीचा वापर केला. या प्रणालीच्या मदतीने शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता कमी असते आणि ही शस्त्रक्रिया विनाअडथळा पार पडते. या महिलेवर तब्बल साडेपाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले.
हेही वाचा >>>पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबत डॉ. कुलकर्णी म्हणाले, की शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून मधुमेह नियंत्रणात आणला. श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून फुफ्फुसरोग तज्ज्ञाची मदत घेतली. शस्त्रक्रियेच्या आधीच्या दोन महिन्यांत रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक वेळा नैसर्गिक विधी पार पाडताना अडथळे निर्माण होतात. रुग्ण महिलेला कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या नैसर्गिक विधी प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही वेळोवेळी उपचार केले.
हेही वाचा >>>Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
आहारात बदलासोबत व्यायामावर भर
शस्त्रक्रियेआधी महिलेला उच्च प्रथिने, तसेच तंतुमय आहार दिला गेला. तिला किमान ३० मिनिटे ते एक तास पायी चालण्याचा व्यायाम करण्यास सांगण्यात आले. रुग्णाच्या फुफ्फुसाची आणि हृदयाची स्थिती अनुकूल राहावी याकरिता इन्स्पिरेटरी आणि स्पायरोमॅट्री पद्धतीचा अवलंब केला गेला. शस्त्रक्रियेअगोदर रुग्णाच्या विविध आजारांवर नियंत्रण मिळवल्यास शस्त्रक्रियेनंतर कोणताही अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे तिच्या सहव्याधी दोन महिन्यांत नियंत्रणात आणण्यात आल्या. त्यामुळे तिच्या प्रकृतीतील गुंतागुंत कमी होऊन शस्त्रक्रिया करण्यातील धोका कमी झाला.