दिवसभर कामानिमित्त बाहेर असताना स्वच्छतागृहाचा वापर करायची गरज भासली तर महिलांसाठी अत्यंत कमी पर्याय उपलब्ध आहेत. जिथे स्वच्छतागृह आहेत तिथे ती स्वच्छ आहेत का, तिथे पुरेसा आडोसा आहे की नाही, पुरुषांची गर्दी आहे का अशा अनेक गोष्टींचा विचार करून त्या स्वच्छतागृहात कसे जायचे असा प्रश्न महिलांना पडतो. यावर उत्तर म्हणून उल्का सादळकर या पुणेकर महिलेने आकर्षक आणि सुरक्षित स्वच्छतागृहांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
या कामाचे विशेष म्हणजे ही स्वच्छतागृह भंगारात काढलेल्या बसचा चेहरामोहरा बदलून तयार करण्यात आली आहेत. उल्का सांगते, परदेशात अनेक ठिकाणी जुन्या गाडय़ांचा वापर करून अशी स्वच्छतागृह बनवली जातात. पुण्यात ही सोय का नको असा विचार करून स्मार्ट सिटी योजनेच्या काळात आम्ही पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांना भेटून ही कल्पना सांगितली. त्यांनी या कल्पनेचे स्वागत आणि सर्वतोपरी सहकार्य केले.
एका बसचे रूपांतर स्वच्छतागृहात करण्यापासून हा उपक्रम सुरू झाला, आज शहरात विविध ठिकाणी अशी बारा स्वच्छतागृह उभी आहेत. वापरण्यासाठी भरपूर पाणी, पिण्याचे पाणी आणि सॅनिटरी नॅपकिन अशा गोष्टी अत्यल्प दरात तेथे उपलब्ध करून दिल्यामुळे हे स्वच्छतागृह महिलांना सोयीस्कर ठरत आहे. स्वच्छता, पाणी आणि प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध असतील तर पाच रुपये मोजून सशुल्क स्वच्छतागृह वापरण्याचीही महिलांची तयारी असते, हे या निमित्ताने दिसून आले आहे.