वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर सुचिता पिंगळे या युवतीने धागा नावाची फर्म सुरू केली. फॅशन डिझायनिंग आणि बेबी गारमेंट तयार करण्याचा छंद ते स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. महिलांना, तरुणींना आवडणाऱ्या आणि त्यांना आपलसं वाटणाऱ्या डिझाइनचा समावेश करून सौंदर्याचा नवा मापदंड धागाच्या उत्पादनांनी घालून दिला आहे. व्यवसाय करत असतानाच फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण वर्गही त्यांनी सुरू केले. डिझायनर विअर, ब्रिडल विअर, पार्टी आणि वेस्टर्न विअर अशा विविध उत्पादनांची विक्री या फर्मच्या माध्यमातून केली जाते.

सुचिता पिंगळे यांनी धागा फर्मची स्थापना २०१२ मध्ये केली. प्रोप्रायटरशीप फर्म म्हणून धागाची नोंदणी आहे. धागाच्या माध्यमातून फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात आणि एक ते नऊ वयोगटातील मुलींच्या कपडय़ांची विक्री केली जाते. तसेच साडय़ांपासून विविध प्रकारचे ड्रेस, आकर्षक पर्स तयार केल्या जातात. डिझायनर विअर, ब्रिडल विअर, पार्टी आणि वेस्टर्न विअर अशा विविध उत्पादनांची विक्री फर्मच्या माध्यमातून केली जाते. सुचिता यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर एका खासगी कंपनीत काही वर्षे नोकरी केली. नोकरीमध्ये रस नसल्याने आणि स्वत:चा व्यवसाय करण्याची आवड असल्याने व्यवसाय करण्याचे त्यांनी निश्चित केले. नेमका व्यवसाय कोणता करायचा, हे मात्र ठरत नव्हते. फॅशन डिझायनिंगची आधीपासूनच आवड असल्याने त्याचे दोन अभ्यासक्रम सुचिता यांनी पूर्ण केले आणि बेबी गारमेंटमध्ये मोठा वाव असल्याने हाच व्यवसाय करायचे त्यांनी निश्चित केले. कर्वेनगरमधील एका खासगी इन्स्टिटय़ूटमधून एक वर्षांचा फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम सुचिता यांनी पूर्ण केला आणि व्यवसायाला सुरुवात केली. त्याबरोबरच फॅशन अ‍ॅण्ड टेक्स्टाइल डिझायनिंगचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करायचा होता. या अभ्यासक्रमाचे शुल्क व्यवसायातील नफ्यातून भरण्याची इच्छा होती. परंतु, व्यवसायाला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे तितकासा जम बसलेला नव्हता. त्यामुळे २०१३ पासून फॅशन डिझायनिंगचे घरगुती क्लासेस घेण्यास सुचिता यांनी सुरुवात केली. घरगुती क्लासेस आणि बेबी गारमेंटचा व्यवसाय यांची सांगड घालत सुचिता यांनी फॅशन अ‍ॅण्ड डिझायनिंगचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीला अनेक अडचणी त्यांना आल्या. फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात मोठी स्पर्धा असल्याने व्यवसायासाठी ग्राहक मिळविण्याचे मोठे आव्हान होते. उत्पादनांची विक्रीच नसल्याने जाहिरात करण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, अशा परिस्थितीतही डगमगून न जाता सुचिता यांनी कोथरूड, कर्वे नगर, वारजे-माळवाडी या भागांसह पुण्यातील विविध भागातील दुकानांमध्ये जाऊन उत्पादने दिली. मोठी स्पर्धा असल्याने सुचिता यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. महिला, तरुण मुली, महाविद्यालयीन कोणत्या प्रकारचे ड्रेस, पर्स आवडतात, कोणत्या उत्पादनांना बाजारात सर्वाधिक मागणी असते हे या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार आपल्या उत्पादनांमध्ये त्यांनी बदल केला. मौखिक प्रचारातून आणि नमुना उत्पादने दिलेल्या दुकानांमधून हळूहळू मागणी येऊ लागली. तसेच समांतर पातळीवर फॅशन डिझायनिंगच्या घरगुती क्लासेसलाही प्रतिसाद वाढू लागला.

‘फॅशन डिझायनिंगच्या प्रशिक्षण वर्गाची दिवसाला एकच बॅच होती. हळूहळू प्रतिसाद वाढत जाऊन आता दिवसभरात सकाळी अकरा ते एक, दुपारी दोन ते चार आणि चार ते सहा असे तीन वर्ग सुरू आहेत. प्रशिक्षण वर्गाचा दर्जा खालावू नये आणि प्रत्येक महिला किंवा मुलीला विषय व्यवस्थित समजून घेता यावा यासाठी एका वेळी केवळ आठ ते दहा महिलांनाच प्रशिक्षण दिले जाते. २०१३ पासून आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण क्लासच्या माध्यमातून देण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गात महिलांची ड्रेस डिझायनिंगला, तर तरुणींची वेस्टर्न वेअरला सर्वाधिक मागणी आहे. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत असतात. त्यानुसार सध्या टी-शर्ट आणि फॅब्रिक प्रिंटिंगला देखील मागणी आहे. धागाने बनविलेले कपडे पाहून ते आपल्यासाठीच तयार करण्यात आले आहेत, हा विश्वास महिला आणि युवतींमध्ये आला आहे. याचे समाधान आहे’, असे सुचिता नमूद करतात.

बेबी गारमेंटच्या उत्पादनांसाठी लहान मुलांची दुकाने आणि घरगुती स्वरूपात पहिल्यांदा मागणी आली. त्याबरोबरच लग्न, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांसाठी लहान मुलींच्या कपडय़ांना मागणी असते. संक्रात सणानिमित्त धागाच्या वतीने एक ते पाच वयोगटातील मुलींच्या आकर्षक कपडय़ांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि फर्मचे नाव घरोघरी पोहोचण्यात प्रदर्शनाचा वाटा महत्त्वपूर्ण ठरला.

‘सध्या धागाच्या उत्पादनांची कोथरूड, वारजे माळवाडी, कर्वेनगर, येवलेवाडी यासह पुण्याच्या विविध उपनगरांमध्ये खासगी स्वरूपात आणि दुकानांच्या माध्यमातून विक्री होते. मात्र, फर्मच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी एखादे दुकान घेण्याचा मानस आहे. तसेच विपणनावर अधिक भर देऊन पुण्याच्या बाहेर राज्यभरात आणि विविध राज्यांमध्ये विक्री करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत’, असेही सुचिता सांगतात.

prathamesh.godbole@expressindia.com

Story img Loader