सँडविच हा तसा काही फार लोकप्रिय प्रकार नव्हता त्या काळातली ही गोष्ट आहे. रविवार पेठेतील बोहरी आळीत तेव्हा ‘ए-वन सँडविच’ नावाने एक गाडी उभी राहू लागली होती. दीनकर रायकर यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. रायकर मूळचे बारामती जवळच्या मोरगाव आंबी या गावचे. पैलवानकीतही त्यांचं नाव होतं. नोकरीच्या निमित्तानं ते पुण्यात आले होते. एका दुधाच्या गाडीवर काम करता करता त्यांनी सँडविचचा व्यवसाय सुरू केला. या गोष्टीला आता पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ही गाडी सुरू झाली तेव्हा रायकरांच्या गाडीवर मिळणाऱ्या सँडविचची किंमत पन्नास पैसे आणि एक रुपया अशी होती. त्यांच्या या नव्या प्रयोगाला हळूहळू यश मिळत गेलं आणि व्यवसायातही चांगला जम बसला. रायकरांचे बंधूही त्यांना याच व्यवसायात साथ देऊ लागले.
रविवार पेठ हा बाजारपेठेचा परिसर. त्यामुळे या बाजारपेठेतील व्यापारी वर्ग आणि खरेदीला येणारी मंडळी अशा दोन्ही प्रकारचे ग्राहक ए वन सँडविचला मिळाले. पुढे स्वत:चं वेगळेपण जपण्यासाठी रायकर यांनी या सँडविचच्या व्यवसायाचं नामकरण ‘सुदाम ए-वन सँडविच’ असं केलं. खवय्यांमध्ये प्रसिद्ध असलेलं हेच ते सुदाम सँडविच.
रायकर यांची पुढची पिढी म्हणजे त्यांचे मुलगे शिवाजी आणि विशाल हेही दोघं पुढे याच व्यवसायात आले. विशाल यांनी एसएससी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताच गाडीवर अनुभव घ्यायला सुरुवात केली आणि पुढे दोघंही सँडविचच्या व्यवसायात रुळले. कष्टाचे, प्रामाणिकपणाचे आणि व्यवसायात यश मिळवायचं असेल तर पदार्थाच्या दर्जात कुठेही तडजोड करू नका, हे संस्कार वडिलांकडून आमच्यावर झाले आणि त्याचा व्यवसायात खूप उपयोग होत असल्याचं विशाल रायकर आवर्जून सांगतात. या संस्कारांमुळेच सुदाम सँडविच हे नाव प्रसिद्ध तर झालं आहेच, शिवाय व्यवसायाचा विस्तारही रायकर यांच्या पुढच्या पिढीनं केला आहे. संभाजी उद्यानासमोर जंगली महाराज रस्त्यावर सुदाम सँडविचची शाखा गेल्यावर्षी सुरू झाली आणि तिथेही आता हा व्यवसाय रुजला आहे.
सँडविचच्या या रविवार पेठेतील गाडीवर किंवा संभाजी उद्यानासमोरील दुकानात किती प्रकार मिळणार, फार फार तर पाच-सहा असं कोणाला वाटलं तर त्याने ‘सुदाम सँडविच’ला नक्की भेट द्यावी. सँडिवचमध्येही किती प्रकार मिळू शकतात, हे इथे गेल्यावर कळतं. व्हेज चिज सँडविच, स्पेशल क्लब सँडविच, चटणी-चिज पोटॅटो स्पेशल सँडविच हे सुदामकडचे काही लोकप्रिय प्रकार. शिवाय प्लेन चीज सँडविच, ब्रेड बटर, चटणी सँडविच, स्पेशल सँडविच अशा प्रकारांबरोबरच नव्यानं सुरू करण्यात आलेले चॉकलेट ग्रील सँडविच, स्पेशल सुदाम मिक्स टोस्ट सँडविच, स्पेशल बाँम्बे मसाला टोस्ट सँडविच हे काही प्रकारही आता खवय्यांनी आपलेसे केले आहेत. ग्रील करून दिलं जाणारं हे सँडविच आपल्या डिशमध्ये इतक्या सुंदर सजावटीनं येतं, की ते पाहूनच आपण त्याची तारीफ करतो. बॉम्बे मसाला टोस्ट सँडविचसाठी नेहमीची चटणी आणि त्या बरोबरच काही खास मसाले तयार करण्यात आले आहेत. त्यांचा वापर करून हे सँडविच तयार केलं जातं. स्पेशल सुदाम मिस्क टोस्ट सँडविचची सजावटसुद्धा कोणीही दाद देईल अशी असते. साधारणपणे चाळीस ते ऐंशी रुपयांपर्यंत या सगळ्या सँडविचच्या किमती आहेत.
रोज दुपारी साधारण दोन ते रात्री दहा-अकरा पर्यंत दोन ठिकाणी हा व्यवसाय चालतो. मात्र त्याची तयारी सकाळपासूनच सुरू होते. विशाल रायकरांची पहिली फेरी असते सकाळी मंडईत. काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची यासह अनेक गोष्टींची खरेदी करताना प्रत्येक भाजीचा दर्जा चांगलाच असेल याकडे बघितलं जातं. भाजी खरेदी झाली की पुढची कामं रायकर यांच्या घरी होतात. त्यानंतर कापलेली काकडी, टोमॅटो, उकडलेले बटाटे, चटण्या आदी सर्व माल दोन्हीकडे पोहोचतो आणि मग प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात होते. या दोन्ही ठिकाणचं वैशिष्टय़ म्हणजे कितीही गर्दी असली तरी सँडविच तयार करणारे जे कारागीर आहेत, ते ज्या पद्धतीनं आणि गतीनं कामं करतात ते सगळं बघत राहावं असंच असतं. त्यामुळे गर्दी असली तरी उशीर झाला असं इथे कधीच होत नाही.
अर्थात चव आणि दर्जा राखायचा तर त्याच्यासाठी लागणाऱ्या पदार्थामध्ये तडजोड चालत नाही. त्यामुळेच सुदाम सँडविचसाठी कॅम्पमधील रॉयल बेकरीचा ब्रेड आणि प्रवीणचा सॉस वापरला जात आहे. कित्येक वर्षांत त्यात बदल नाही. पदार्थाची चव आणि दर्जा चांगला ठेवला, ग्राहकांच्या आवडीनिवडींवर लक्ष ठेवलं, उत्तम आणि तत्पर सेवा दिली तर खवय्यांकडून पसंती मिळतेच, हा विशाल यांचा अनुभव आहे.
कुठे आहे?
रविवार पेठ, बोहरी आळी,
(दुपारी दोन ते रात्री साडेदहा)
संभाजी उद्यानासमोर, जंगली महाराज रस्ता
(दुपारी साडेअकरा ते रात्री साडेअकरा)