शालेय जीवनात ‘सुदर्शन’ वह्य़ांशी ओळख झाली नाही, असा इसम विरळाच! महाराष्ट्राच्या घराघरात आणि गुजरातमध्येही लोकप्रिय झालेल्या या सुदर्शन वह्य़ा पुण्यात सदाशिव पेठेत बनतात हे मात्र अनेकांना माहीत नसते. फाळणीच्या वेळी भारतात आलेल्या एका स्थलांतरित सिंधी कुटुंबाने हा ‘ब्रँड’ सुरू केला आणि आता तो अस्सल पुण्याचा म्हणूनच ओळखला जातो.

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर तिकडची अनेक कुटुंबे भारतात आली. पाकिस्तानातील ‘उबावडो’ या ठिकाणी राहणारे करमचंदानी हे सिंधी कुटुंबही त्यातलेच. गावी त्यांची शेती होती, शिवाय स्टेशनरीचे दुकानही होते. ते स्वत: वह्य़ा बनवून विकत. काही काळ हे कुटुंब मुंबई आणि गुजरातमध्ये राहिले. फाळणीच्या वेळी देशात आलेल्या स्थलांतरित कुटुंबांची पुण्यात सरकारने पिंपरी कॅम्पमध्ये सोय केली होती. तिथे करमचंदानींना जागा मिळाली आणि तेव्हापासून ते पुण्याचे होऊन गेले. १९६० मध्ये किशनचंद करमचंदानी यांनी त्यांच्या वह्य़ांच्या व्यवसायाची पुण्यातही सुरुवात केली. शनिपाराजवळ उत्पादन आणि विक्री सुरू झाली. आपल्यापैकी प्रत्येकाने शालेय जीवनात किमान एकदा तरी वापरलेल्या याच त्या ‘सुदर्शन’ वह्य़ा! शनिपाराजवळ सुरुवात झालेला हा ‘ब्रँड’ १९७२ पासून उद्यान प्रसाद कार्यालयाशेजारच्या गल्लीत स्थिरावला. महाराष्ट्रासह गुजरात, चेन्नई आणि इंदूरच्याही विद्यार्थ्यांच्या दप्तरात विराजमान झालेल्या या वह्य़ांचे संपूर्ण उत्पादन अजूनही उद्यान कार्यालयाशेजारूनच होते.

आधी किशनचंद आणि त्यांचे भाऊ द्वारकादास करमचंदानी उत्पादन काम पाहत. अनेकदा किशनचंद हे स्वत: पिंपरी-चिंचवडपर्यंत सायकलने जाऊन वह्य़ा पोचवत. नंतर किशनचंद यांचे पुत्र सुदर्शन (यांचेच नाव ब्रँडला दिले गेले) यांच्याकडे विक्रीव्यवस्थेची जबाबदारी सोपवली गेली. खरे त्या काळी पुण्यात वह्य़ांचे चार-पाच उत्पादक होते. सर्वच आपल्या क्षेत्राची उत्तम जाण असलेले आणि संघटना बांधून एकत्र देखील आलेले. वह्य़ांसाठी कोणता कागद वापरावा, वही किती पानी असावी, यांसारखे निर्णय ते सगळे एकत्र बसून घेत. तरीही प्रत्येक जण स्वत:चे काही ना काही वैशिष्टय़ जपत असे. मुंबईतील वही उत्पादक पुण्यातील या उत्पादकांचा दर पाहून आपला दर ठरवत. ग्राहकांना आकर्षित कसे करावे, उत्पादन विकावे कसे याचे चांगले ज्ञान सुदर्शन करमचंदानींना होते. तो काळ आतासारखा जाहिरातींचा नव्हता. ‘माऊथ पब्लिसिटी’ हीच सर्वात मोठी जाहिरात असे. सुरुवातीला त्यांच्या कंपनीकडे कामगार कमी होते आणि भांडवलही. पण वहीच्या पानांचा उत्तम दर्जाचा कागद आणि मजबूत शिवण यावर त्यांनी उत्तम जम बसवला. आता २००० पासून व्यवसाय सुदर्शन यांचे पुत्र आनंद हेच व्यवसाय बघतात.

पेपर स्टेशनरीच्या व्यवसायात स्पर्धा खूप आहे. हे मार्केट ‘प्राइज सेन्सिटिव्ह’ असल्यामुळे त्यात वहीचा आकार कमी करणे किंवा पाने कमी करणे हे सर्रास चालते. ‘सुदर्शन’ने मात्र सुरुवातीपासून नेहमीच्या वह्य़ांच्या पानांची संख्या कधी कमी केली नाही. कितीही स्पर्धा असली तरी खराब दर्जाचा कागद वापरायचा नाही, हेही कायम पाळले. राज्यात सगळीकडे जाणाऱ्या या वह्य़ा गेली तीन वर्षे गुजरातमध्येही पाठवल्या जात आहेत. गुजरातचे मार्केटही चांगले विकसित झाले आहे. आता चेन्नई आणि इंदूर ही त्यांच्यासाठी नवी मार्केट्स आहेत. आता कंपनीने पुण्यातच जवळपास २० हजार चौरस फुटांच्या जागेत आणखी एक कारखाना सुरू करण्याचे ठरवले आहे. शिवाय त्यांना पेन, स्टेपलर, कंपॉस बॉक्स अशा इतर स्टेशनरीच्याही व्यवसायात उतरायचे आहे. त्यासाठी चीनमधील एका कंपनीशीही त्यांची बोलणी सुरू आहेत.

वह्य़ांची शिवण आणि कागद चांगला हवा, त्यासाठी अधिक पैसेही मोजू, असा पुणेकरांचा आग्रह असतो; अगदी बॉक्स फाइलसुद्धा दहा-दहा वर्षे वापरणारे ग्राहकही आहेत, त्यामुळे उत्तम टिकणाऱ्याच फाइल्सच त्यांना हव्या असतात, असे आनंद करमचंदानी आवर्जून सांगतात. पुणेकरांनी ‘सुदर्शन’च्या दर्जाला दाद तर दिलीच, तितकीच ‘माऊथ पब्लिसिटी’ही केली आणि या ब्रँडला ‘अस्सल पुण्याचा ब्रँड’ असे अलिखित प्रमाणपत्रही त्यांच्याच जिव्हाळ्याने दिले.

sampada.sovani@expressindia.com