पुणे : बनावट शाळांसह नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा शोधण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) अचानक तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सीबीएसईच्या नियमांनुसार निकष, गुणवत्तेची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नियम आणि उपविधी पालनाच्या अनुषंगाने सीबीएसईने दिल्ली, राजस्थानमधील २७ शाळांची अचानक तपासणी केली. त्यासाठी सीबीएसईचे अधिकारी, मुख्याध्यापकांचा समावेश असलेल्या २७ समित्या पाठवण्यात आल्या होत्या. या समित्यांनी केलेल्या तपासणीतून शाळांनी मोठ्या प्रमाणात नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. उपस्थितीच्या नोंदींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश, बनावट प्रवेश दाखवणे, सीबीएसईच्या निकषांनुसार पायाभूत सुविधा उपलब्ध नसणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत. या प्रकाराची सीबीएसईने गंभीर दखल घेऊन नियमभंग करणाऱ्या संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच दोषी शाळांवर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी सीबीएसई कटिबद्ध आहे, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा

मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संलग्नित शाळांनी दर्जा आणि गुणवत्ता राखणे आवश्यक आहे. दिल्ली, राजस्थानमध्ये केलेल्या अचानक तपासणीनंतर आता संलग्नित अन्य शाळांचीही अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: दारू आणि मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या जय-विरुला बेड्या; २१ दुचाकी जप्त

दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक शाळा सीबीएसईची संलग्नता घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, बोगस शाळांची अनेक प्रकरणे राज्यातही उघडकीस आली आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या वर्षी विधानसभेत राज्यातील अनधिकृत असलेल्या ६६१ शाळांपैकी ७८ शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती दिली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudden inspection of schools by cbse strict action in case of violation pune print news ccp 14 ssb