पुणे : पुणे विमानतळाचा दिवसेंदिवस होणारा विस्तार आणि आंतरराष्ट्रीय विमानांना प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विमानतळाच्या क्षमतेनुसार हवाई दळणवळण क्षमता शंभर टक्के पूर्ण झाली असून व्यावसायिक आणि औद्याोगिक दृष्ट्या विमानतळाचा विस्तार वेगाने होणे गरजेचे आहे, अशी स्पष्ट भूमिका मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे (एमसीसीआय) माजी अध्यक्ष सुधीर मेहता यांनी व्यक्त केली.
पुणे आंतरारष्ट्रीय विमानतळावरून रविवारी (१२ ऑक्टोबर) सर्वाधिक २०८ विमानांची विक्रमी नोंद झाली. विमानतळावरून १०४ विमानांची उड्डाणे , तर १०४ विमाने पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले आहेत. त्यानुसार दिवसभरात ३३ हजार प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला असून आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक विमानांची वाहतूक झाल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. हवाई वाहतुकीमुळे शहरे जवळ येत असून व्यावसायिक आणि औद्याोगिकदृष्ट्या विमानांच्या उड्डाणांची संख्येबाबत मेहता यांनी दैनिक ‘लोकसत्ता’शी बोलताना भूमिका स्पष्ट केली. मेहता म्हणाले, ‘लोहगाव विमानतळावरून एका दिवसात १०४ विमानांची उड्डाणे होत असले, तरी विमानतळाचा होणारा विस्तार आणि प्रवाशांची वाढता प्रतिसाद पाहता ही उड्डाणे २ ते ३ टक्केच आहेत. दिवसभरातून ४०० ते ५०० विमानांची उड्डाणे होणे अपेक्षित आहे, अर्थात यामध्ये अनेक अडचणी असल्या, तरी पुण्याच्या ‘आयटी हब’ आणि ‘इकोनॉमिक ग्रोथ’च्या दृष्टीने विस्तार होणे अत्यंत महत्वाचे आहे. सद्या स्थितीला पुण्यातून होणाऱ्या विमानांच्या उड्डाणांना प्रवाशांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यातूनच आता उड्डाणांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे स्पष्ट होत आहे. त्यासाठी तातडीने नियोजन महत्वाचे आहे.’ हवाई दळणवळणाच्या माध्यमातून आणखी शहरे जोडणे महत्वाचे आहे, असे मेहता यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
‘आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवावीत’
पुणे विमानतळावरून दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या तीन ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे होत आहेत. ही विमानसेवा सुरू झाल्यापासून पूर्ण क्षमतेने विमानांचे आरक्षण होत असून या ठिकाणी आणखी विमानांची उड्डाणे सुरू करावी. व्यावसायिक दृष्टीकोनातून पुणे ते दुबई विमानांची उड्डाणे वाढवावी. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने अबुधाबी, युरोप आदी देशांसाठी देखील आमची मागणी आहे. ही शहरे आणखी वेगाने जवळ येतील, असेही मेहता यांनी सांगितले.