डॉ. अरुणा ढेरे यांचे मत
अंतर्बाह्य़ कवी असलेल्या सुधीर मोघे यांना काय करायचे आणि काय म्हणायचे हे नेमकेपणाने ठावूक होते. समृद्ध जगण्याचे प्रतिबिंब हे त्यांच्या कवितेमध्ये पडत गेले. ‘कविता सखी’ हे मोघे यांच्या कवितेचे आत्मकथन आहे, असे मत प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी व्यक्त केले.
स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सुधीर मोघे यांच्या ‘कविता सखी’ या पुस्तकाचे प्रकाशन अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेले ‘कविता सखी’ हे सदरलेखन परममित्र प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, डॉ. शुभदा सुधीर मोघे आणि प्रा. प्रकाश भोंडे या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात संजय गाखले, शाल्मली गोखले आणि विक्रांत महाजन यांनी ‘कविता एका निरंकुशाची’ हा मोघे यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम सादर केला.
ढेरे म्हणाल्या, मराठी रसिकता घडविण्यामध्ये भावकवितेचे वेगळे स्थान आहे. गदिमा आणि शांताबाई शेळके यांच्या भावगीतांची मैफल मोघे यांनी पुढे नेली.
आनंदाचं तळं गढूळ होऊ न देण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते. या भरलेल्या तळ्याची ओल त्यांच्या लेखनात दिसते. कलाविष्काराचे वेगळे प्रयोग हाताळले असले तरी त्यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. हे प्रयोग यशापयशामध्ये तोलता येत नाहीत. त्यामागची मन:पूर्वकता आणि गांभीर्यता महत्त्वाची असते.
संगोराम म्हणाले, कवीला कविता सुचली कशी यापासून ते कवितेचे रूप कसे असते हे उलगडावे हा उद्देश या सदरलेखनामागे होता. एक माणूस कवितेकडे पाहतो या आकृतीबंधातून हे लेखन करणार असे मोघे यांनी सांगितले होते.
या लेखनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. आपण कवी आहोत हा जाज्वल्य अभिमान फार थोडय़ा लोकांना असतो त्यामध्ये मोघे होते. शुभदा मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रकाश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अरुण नूलकर यांनी
सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा