‘सखी मंद झाल्या तारका’, ‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी’, ‘दयाघना’, ‘आला आला वारा’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘सांज ये गोकुळी’, ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ यासारख्या रचनांनी लोकप्रिय झालेले ज्येष्ठ कवी-गीतकार सुधीर मोघे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी डॉ. शुभदा मोघे आहेत. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे हे त्यांचे ज्येष्ठ बंधू होत.
मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे सुधीर मोघे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना अर्धागवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीतील गुंतागुंत वाढली. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी मोघे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोघे यांच्या निधनाबद्दल यशवंत देव, श्रीधर फडके आदी संगीतकारांनी तसेच मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
लोकप्रिय गीते
*एक झोका चुके काळजाचा ठोका
*गुज ओठांनी
ओठांना सांगायचे
*जरा विसावू या वळणावर
*झुलतो बाई रासझुला
*दिसं जातील दिसं येतील
*दृष्ट लागण्याजोगे सारे
*देवा तुला शोधू कुठं
*भन्नाट रानवारा
*मी सोडून सारी रात
*रात्रीस खेळ चाले