यंदाच्या उसाच्या गळीत हंगामाला अद्याप गती आली नाही. मागील वर्षीच्या हंगामात दोनशे कारखाने सुरू होते. यंदा सात नोव्हेंबरअखेर केवळ ९३ कारखाने सुरू आहेत. त्यात ४६ सहकारी आणि ४७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. हंगामाची ही संथ गतीने झालेली सुरुवात अखेरच्या टप्प्यात अडचणीची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>>पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई विशेष रेल्वेला मुदतवाढ; प्रवाशांच्या मागणीमुळे रेल्वेचा निर्णय
राज्यातील उसाचा गाळप हंगाम पंधरा ऑक्टोबरला सुरू झाला आहे. पण, दिवाळी, परतीचा पाऊस आणि ऊसतोड कामगार टंचाईमुळे कारखाने वेळेत सुरू होऊ शकले नाहीत. नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटला तरीही अद्याप केवळ ९३ कारखानेच सुरू आहेत. त्यात ४६ सहकारी आणि ४७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>पुणे:‘पीएमपी’च्या ताफ्यात आणखी १०० गाड्या, संचालक मंडळासमोर लवकरच प्रस्ताव
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, सात नोव्हेंबरअखेर कोल्हापूर विभागात २६, पुणे विभागात २०, सोलापूर विभागात २७, अहमदनगर ११, औरंगाबाद ५, नांदेड ३, अमरावती १ तर नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरू झालेला नाही. आयुक्तालयाने नियमानुसार राज्यातील १६५ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे, त्यात ८४ सहकारी आणि ८१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. मागील वर्षी याच काळात सुमारे १२५ कारखाने सुरू होते.
हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
मराठवाड्यात गाळपाचा प्रश्न गंभीर होणार?
मागील वर्षी मराठवाड्यातील गाळपाचा प्रश्न गंभीर झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोडणी यंत्रे पाठवून शिल्लक राहिलेला ऊस कसाबसा तोडला होता. मार्चनंतर उन्हाचे चटके वाढताच ऊसतोडणी मजुरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय थंडी संपताच साखरेचा उताराही घटतो. कारखान्यांना अपेक्षित प्रमाणात ऊस मिळत नसल्यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेने चालविता येत नाही, त्यामुळे कारखाने आर्थिक नुकसानीत जातात. त्यामुळे कारखाने वेळेत सुरू होऊन वेळेत हंगाम संपविणे हे कारखाने आणि शेतकरी दोघांसाठीही फायदेशीर असते.
हेही वाचा >>>पुणे: गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला
हंगामाला अपेक्षित गती आलेली नाही, हे खरे आहे. मात्र, प्रति एकर अपेक्षित ऊस उत्पादनात काही प्रमाणात तूट येत आहे. यंदा परतीचा पाऊस आणि दिवाळीमुळे कारखाने वेळेत सुरू झाले नाहीत. मागील वर्षी हंगाम रखडल्यामुळे पूर्व तयारीसाठी कमी वेळ मिळाला. तरीही गळीत हंगाम एप्रिलअखेर संपविण्याचे कारखान्यांचे नियोजन आहे.– जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ