यंदाच्या गळीत हंगामामध्ये साखरेचा उतारा वाढला असला, तरी साखरेचे उत्पादन घटले असल्याचे दिसून येत आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्चपर्यंतच्या ऊस गाळप अहवालानुसार, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात शंभर लाख क्विंटलने घट झाली असून, त्यामुळे येत्या काळात साखर भाव खाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाच्या हंगामामध्ये राज्यातील कोल्हापूर, पुणे, नगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये एकूण १७७ साखर कारखाने सुरू होते. त्यात सहकारी ९९ तर खासगी ७८ कारखान्यांचा सहभाग होता. सद्य:स्थितीमध्ये त्यातील ११९ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाल्याने या कारखान्यांमधून उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या केवळ ५८ कारखाने सुरू आहेत. येत्या काही दिवसांत हे कारखानेही बंद होतील. २०१४-२०१५ या वर्षांच्या हंगामामध्ये १७८ कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन झाले. या कारखान्यांमध्ये मार्चअखेर ९०८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. मार्च अखेरीस यंदा मात्र साखरेचे उत्पादन घटून ते ८०८ लाख क्विंटल झाले आहे.
ऊस गाळप अहवालानुसार यंदा कारखान्यांची दैनंदिन ऊस गाळपाची क्षमता वाढली आहे. त्याचबरोबरीने सारखेचा उताराही वाढला आहे. मात्र साखरेच्या उत्पादनामध्ये घट दिसून येत असल्याने पुढील काळात सारखेच्या दरवाढीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व नागपूर आदी विभागातील कारखान्यांच्या ऊस क्षेत्रामध्ये यंदा उसाचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला आहे. पुणे व कोल्हापूर विभागात अद्यापही काही कारखान्यांमध्ये उसाचे गाळप सुरू आहे. मात्र, त्यातूनही मागील वर्षांइतके साखरेचे उत्पादन होणार नसल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा