लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : उसावर रोग, अनियमित हवामानामुळे वजनात घट आणि गळीत हंगामावर परिणाम झाल्याने देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राज्यातही साखरेचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

उसाच्या गाळप हंगामाबाबत पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन करणारे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र राज्य असून यंदा उसाच्या गळीतावर आणि उताऱ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतांश साखर कारखान्यांचे गाळप संपले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८३८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. गेल्या हंगामात १०३० लाख मेट्रिक टन गाळप झाले. सध्या ७९.२० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले असून ते मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील २०० पैकी १८० कारखाने बंद झाले आहेत. मागीलवर्षी ही संख्या १०३ होती.’

‘उत्तर प्रदेशातील उसाचे गाळप ८७५ लाख मेट्रिक टन झाले असून, मागील वर्षी ८७६ लाख मेट्रिक टन होते. मागील वर्षी ९२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, यंदा ८४ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत घरगुती वापरासाठी साखरेचा विक्री कोटा १३७.५० लाख मेट्रिक टन निर्धारित केला होता. उत्पादन घटल्याने ‘एस ग्रेड’ साखरेची किंमत ३७८० ते ३८३० रुपये प्रतिक्विंटल आणि ‘एम-ग्रेड’ साखरेची किंमत ३९६५ ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल आहे.’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

‘आगामी आर्थिक वर्षांत साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुमारे ११० ते १२० आणि देशात ३५० लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आवश्यक झाला आहे. साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) अवलंब केला, तर ४० टक्क्यांनी उत्पादन वाढवता येईल. तसेच ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येणे शक्य आहे. पुढील हंगामात या तंत्रज्ञानाचा अवलंब होण्याची शक्यता आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

Story img Loader