लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : राज्यात उसाच्या गाळप हंगामाने गती घेतली असली तरीही मागील वर्षाच्या तुलनेत हंगामातील गाळप आणि साखर उत्पादन कमी आहे. २५ डिसेंबरअखेर राज्यात ३३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच काळात ४१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा साखर उत्पादनात राज्य आठ लाख टनांनी कमी झाले आहे.

यंदा राज्यात १९४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. या कारखान्यांनी ३७७ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ८.७६ टक्के साखर उताऱ्याने ३३ लाख टन साखर उत्पादन केले आहे. मागील वर्षी याच काळात २०१ कारखान्यांनी ९.२७ टक्के साखर उताऱ्याने ४५ लाख टन उसाचे गाळप करून ४१ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. यंदा गाळप हंगाम तब्बल महिनाभर उशिराने सुरू झाला. ऊसदाराच्या आंदोलनामुळे कोल्हापूर, पुणे विभागात कारखाने बंद राहिले. त्यानंतर गाळपाने वेग घेतला असला तरीही राज्यातील साखर कारखान्यांना अद्यापही पुरेसा ऊस मिळत नाही. अपेक्षित उताराही मिळत नाही. आता थंडी वाढल्यामुळे साखर उताऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा निर्णय लांबणीवर

दरम्यान, कोल्हापूर विभागाने ७.७, पुणे विभागाने ७.९, सोलापूर विभागाने ६.५, नगर विभागाने ४.१, छत्रपती संभाजीनगर विभागाने २.६, नांदेड विभागाने ३.७ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. सोलापूर विभागात यंदा सर्वाधिक ४७ कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी ८१ लाख टन उसाचे गाळप करून ६.५ लाख टन साखर उत्पादीत केली आहे. साखर उतारा सरासरी ८.०३ टक्के राहिला आहे.

किमान एफआरपी देण्याचे आदेश

गाळप हंगाम २०२३-२४चा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत सुरुवातीला गाळप झालेल्या उसाला किमान रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. पुणे आण नाशिक महसूल विभागातील कारखान्यांनी १०.२५ टक्के साखर उतारा गृहीत धरून प्रति टन ३०१५ रुपये आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागातील कारखान्यांनी ९.५० टक्के साखर उतारा गृहीत धरून प्रति टन २०९१ रुपये द्यावेत, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अंतिम साखर उतारा निश्चित झाल्यावर उर्वरीत रक्कम अदा करावी, असेही सरकारने शासन आदेशात म्हटले आहे.

आणखी वाचा-पुणे : मतदार नोंदणी करायला गेले अन्…

नऊ लाख टन क्षमतेने गाळप

पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पडलेला पाऊस आणि थंडीत झालेली वाढ यामुळे चांगला साखर उतारा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात गाळप वेगाने सुरू असून, सरासरी दैंनदिन नऊ लाख टनांनी गाळप सुरू आहे, असे राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar production slowed down pune print news dbj 20 mrj