नारायणगाव : कृषी पंपाला आकडा टाकून केलेल्या वीजचोरीच्या घटनेमध्ये ३० गुंठे ऊस जळीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे राकेश दरंदाळे (रा. वाजगे मळा) याच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
हेही वाचा >>> नारायणगावमध्ये ६७ हजारांची वीजचोरी; जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी अध्यक्षाच्या मुलावर गुन्हा दाखल
सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश सुदाम बनसोडे आणि शहर तंत्रज्ञ महादेव माणिक साळुंके यांनी २८ फेबुवारी २०२२ रोजी केलेल्या दैनंदिन तपासणीमध्ये वाजगे मळा गव्हाळी येथे श्रीकांत रभाजी वाजगे यांच्या शेतामध्ये आकडा टाकून कृषी पंपाचा वापर करत असल्याने दिसले.
हा आकडा वाजगे यांची जमीन कसत असणाऱ्या राकेश दरंदाळे याने टाकला असल्याचे सांगण्यात आले. या आकड्यामुळे लता वसंत भुजबळ यांचा ३० गुंठे ऊस जळीत झाला. वीज वापरदार राकेश दरंदाळे याने गेल्या वर्षभरात १६३४ युनिट्सची वीज चोरी केली असून महावितरण कंपनीचे १३ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऋषिकेश बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नारायणगाव पोलिसांनी राकेश दरंदाळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.