पुणे : यंदाच्या गाळप हंगामात २१ डिसेंबरअखेर ३२३.२७ लाख टन उसाचे गाळप करून २८५.८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सहकारी ९४ आणि खासगी ९८, अशा एकूण १९२ कारखाने गाळप करीत आहेत. थंडीमुळे उताऱ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाचा गाळप हंगाम तब्बल महिनाभर उशिराने सुरू झाला. जास्त कारखाने असलेल्या पुणे आणि कोल्हापूर साखर विभागात उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरासाठी (एफआरपी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू झाल्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत गाळप हंगामाने गती घेतली नव्हती. आता गाळप हंगाम वेगाने सुरू झाला आहे. सुमारे दैनंदिन आठ लाख टन क्षमतेने गाळप सुरू आहे.

हेही वाचा >>> खाद्यतेलाच्या आयातीला मुक्तद्वार, देशात सोयाबीन, सूर्यफुलाला हमीभावही मिळेना

गाळप आणि साखर उत्पादनात कोल्हापूर आणि पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. २८५.९९ लाख क्विंटलपैकी कोल्हापूर विभागाने ९.७९ साखर उताऱ्यासह ६६.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. त्या खालोखाल पुणे विभागाने ६६.५७ लाख क्विंटल, सोलापूर ५७.६ लाख क्विंटल, नगर ३६.४६ लाख क्विंटल, औरंगाबाद २३.१७ लाख क्विंटल, नांदेड ३२.६६ क्विंटल, अमरावती २.५४ आणि नागपूर विभागाने ०.१५ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गाळप आणि साखर उताऱ्यात घट झाली आहे. मागील वर्षी २१ डिसेंबरपर्यंत १९८ कारखान्यांनी ४०८.३ लाख टन उसाचे गाळप करून ९.१९ टक्के उताऱ्याने ३७५.०७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले होते.

हेही वाचा >>> आर्क्टिकवर आजवरचा सर्वांत उष्ण उन्हाळा ? जाणून घ्या जगावर काय परिणाम होणार…

यंदा गाळप हंगाम उशिराने सुरू होणे. उसाची उपलब्धता कमी असणे, खोडवा उसाचे प्रमाण जास्त असणे आणि केंद्राच्या निर्णयामुळे उडालेला गोंधळ आदी अडथळ्यामुळे गळीत हंगामाची सुरुवात संथगतीने झाली. आता गाळपाला वेग आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर यांनी दिली. गाळप हंगामाची सुरुवात संथ गतीने झाली होती. आता वेगाने गाळप सुरू आहे. मजुरांच्या तुटवड्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. थंडीत वाढ झाल्यामुळे आता साखर उताऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे, असेही दांडेगावकर म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane crushing season started late due to output drops pune print news dbj 20 zws