साखर आयुक्तांचे आदेश
पुणे : यंदा चांगला पाऊस झाल्याने विक्रमी ऊस उत्पादन झाले असून विक्रमी गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये, गाळप बंद करण्याबाबत १५ दिवस आधी प्रसारमाध्यमांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्वसूचना द्यावी, गाळपासाठी ऊस शिल्लक असतानाही गाळप बंद केल्यास संबंधित कारखान्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
यंदा राज्यातील साखर कारखान्यांकडून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी गाळप हंगामाला सुरुवात झाली. चालू हंगामासाठी राज्यात १२.३२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. मोठय़ा प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने सर्व कारखान्यांनी गाळप हंगामासाठी उपलब्ध उसाचे संपूर्ण गाळप होईल, या दृष्टीने नियोजन करावे.
कारखान्यांकडे नोंदवलेला तसेच नोंदणी न झालेला आणि गाळपास उपलब्ध असलेल्या उसाचे संपूर्ण गाळप होईल, याबाबत सर्व कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यकारी संचालक, खासगी कारखान्यांचे महाव्यवस्थापक, ऊस व्यवस्थापक, शेतकी अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याबाबत कळवण्यात आले आहे.
जे कारखाने साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप बंद करतील आणि जर चालू हंगामासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेला, नोंदवलेला किंवा न नोंदवलेला ऊस शिल्लक राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक यांच्यावर राहील, असेही साखर आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, प्रादेशिक सहसंचालकांनी प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध उसाचा अंदाज घेऊन अतिरिक्त ऊस असल्यास संबंधित कारखान्याचे कार्यकारी संचालक, महाव्यवस्थपकांशी वैयक्तिक संपर्क करून उसाचे पूर्ण गाळप होईल, असे नियोजन करावे.
एखाद्या कारखान्याकडे अतिरिक्त ऊस शिल्लक राहत असल्यास नजीकच्या कारखान्यांना अतिरिक्त राहणारा ऊस गाळप करण्याबाबत सूचना द्याव्यात, जेणेकरून गाळपाअभावी ऊस शिल्लक राहणार नाही, याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
चालू गाळप हंगामाचा आढावा राज्यात १९७ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप घेण्यात येत आहे.
राज्यात जून महिन्यापासून चांगला पाऊस झाल्याने उसाला पोषक वातावरण झाले. यंदा १०९६ लाख टनापेक्षा जास्त उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. गेल्या हंगामात १०६.४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते ११० लाख टनांपेक्षा अधिक होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पूर्वसूचना दिल्याशिवाय गाळप हंगाम बंद करता येणार नसल्याने यंदा गाळप हंगाम लांबणार आहे.
यंदा ११० लाख टनांपेक्षा जास्त गाळप?
यंदा १०९६ लाख टनापेक्षा जास्त उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. गेल्या हंगामात १०६.४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते ११० लाख टनांपेक्षा अधिक होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. यंदा राज्यातील साखर कारखान्यांकडून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी गाळप हंगामाला सुरुवात झाली.