राज्यात १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू झाला असून, आतापर्यंत १८ कारखाने सुरू झाले आहेत. परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याने आणि ऊसतोड मजूर दिवाळीनंतरच मोठ्या संख्येने उपलब्ध होणार असल्यामुळे दिवाळीनंतर गाळप हंगामाला गती येईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

परतीचा मोसमी पाऊस जोरदार झाल्यामुळे ऊसाच्या फडात चिखल आहे. त्यामुळे यंत्राद्वारे ऊस तोडणी करणे शक्य नाही. शिवाय ऊसतोड मजुरांद्वारे तोडणी केली तरीही उसाच्या फडामधून ऊसबाहेर काढताना वाहने चिखलात रुतत आहेत. शेत शिवारांमधील कच्च्या रस्त्यांवर अद्याप चिखल असल्यामुळे ऊस भरलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक बाहेर काढणे अशक्य होत आहे. त्यामुळे अद्यापही राज्यात उसाच्या गळीत हंगामाला जोरात सुरुवात झालेली नाही. २३ ऑक्टोबरअखेर राज्यात नऊ सहकारी आणि नऊ खाजगी, असे एकूण १८ कारखाने सुरू झाले आहेत, अशी माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.

हेही वाचा :महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; राज्य सरकारचे आदेश

दिवाळीनंतर गाळपाला येणार गती

दिवाळीमुळे ऊसतोड कामगार अद्याप मराठवाड्यातच आहेत. हे मजूर दिवाळीनंतर कारखान्यावर येण्यास सुरुवात होणार आहे. यंदा हंगाम उशीराने सुरू झाल्यामुळे मजूर दिवाळी घरी साजरी करून कारखान्यावर येणार आहेत. अशा मजुरांची संख्या जास्त असणार आहे. पाडवा झाल्यानंतर एक-दोन दिवसात मोठ्या संख्येने मजूर कारखान्यांवर दाखल होतील. एक नोव्हेंबरपासून ऊस तोडणीला किंवा उसाच्या गळीत हंगामाला गती येईल, अशी शक्यता कारखानदारांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader