पुणे : महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी ऑनलाइन नोंदणी बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या सर्वच भागांत एकूण पीक नोंदणीपैकी सुमारे चार लाख पाच हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री पिकाची नोंदणी झाली आहे. नगदी पिकांच्या लागवडीबरोबरच हंगामी असलेल्या हरभरा, ज्वारी, गहू, कांदा, मका या पिकांचीदेखील आकडेवारी या उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून समजणे शक्य झाले आहे.
महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही नोंदणी ई-पीक पाहणी या उपयोजनमध्ये करता येते. शेतकरीच या उपयोजनमध्ये पिकांची माहिती, तसेच शेतात उभ्या असलेल्या पिकांची छायाचित्रे अपलोड करू शकतात. जर संबंधित शेतकऱ्याने पिकांचे नोंद ई-पीक पाहणी उपयोजनमध्ये न केल्यास ती तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. त्यानुसार सन २०२२-२३ या वर्षासाठी महसूल विभागाने केलेल्या ई-पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात सर्वाधिक ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.
दरम्यान, ऊस या पिकाच्या लागवडीबरोबरच केळी या पिकाची एक लाख १८ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जळगाव या भागात आतापर्यंत केळी या पिकाची जास्तीत जास्त लागवड होत असे. आता मात्र जळगावसह राज्याच्या उर्वरित भागातही या पिकाचे क्षेत्र वाढू लागले आहे. संत्री या पिकाचे राज्यातील ८५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याबरोबरच डाळिंब पिकाची लागवड ६५ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर झाली असून, हे पीक आता राज्यातील सर्वच भागात मूळ धरू लागले आहे. द्राक्षाची लागवड वाढली असून, सुमारे ६५ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावर सध्या लागवड झाली आहे.
पुढील वर्षी आणखी वाढीची शक्यता
केवळ पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ऊस हे नगदी पीक घेण्याची जोरदार स्पर्धा होती. आता मात्र ही स्पर्धा राज्यभर पोहोचली आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच विभागांत मिळून चार लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आतादेखील ऊस या नगदी पिकाचे उत्पादन वाढू लागल्याचे दिसून आले आहे. महसूल विभागाने ई-पीक पाहणीनुसार ही लागवड ऑगस्टपासून गृहीत धरलेली आहे. पुढील वर्षी ऊस या नगदी पिकाच्या लागवडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.