ज्येष्ठ उद्योजक आणि ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे राजकुमार, डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार हे चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे माजी सभापती विशाल चोरडिया हे त्यांचे नातू होत.
मसाले आणि लोणची या उद्योगातील अध्वर्यू अशी ओळख असलेले हुकमीचंद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० रोजी नगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला होता. कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यातही वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करून विक्री करण्याचा उद्योग केला होता. पुढे पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच संध्याकाळी घरोघरी फिरुन मसाले विक्रीला सुरुवात केली होती.
मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यामुळे ‘गरम मसाला’ आणि सोबतच ‘कांदा-लसूण मसाला’ तयार करुन घरोघरी विक्रीला त्यांनी सुरुवात केली. १९६० मध्ये त्यांनी ‘प्रवीण मसाले’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरु केला. पहिली दहा वर्षे अत्यंत कष्ट करुन पुढे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथेच त्यांनी मोठी जागा घेऊन १९७२ मध्ये व्यवसायाचा विस्तार केला. १९७६ मध्ये सुमारे ५०० किलो लोणचे तयार करुन त्यांनी बाजारात ‘प्रवीण’ ची उत्पादने विक्रीसाठी आणली. त्या व्यवसायाचा विस्तार आता चौथी पिढी करत आहे. भारतभर दहा कारखाने आणि विक्री केंद्रे उभी करण्यात महत्त्वाचे मार्गदर्शन हुकमीचंद यांनी केले होते. ‘प्रवीण’ सोबतच ‘सुहाना’ आणि ‘अंबारी’ हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत.
व्यवसाय करताना अत्यंत आधुनिकता आणि व्यक्तीगत जीवनात साधेपणा हे हुकमीचंद यांचे वैशिष्ट्य होते. सेंद्रीय शेती हा त्यांचा विशेष आवडीचा विषय होता. शिवाय, व्यापारी पेठांमध्ये ‘कैरी आणि मिरची’ या उत्पादनांमध्ये हुकमीचंद यांचा शब्द प्रमाण मानला जाई. मागील जवळपास २० वर्षे ते प्रत्यक्ष व्यवसायात सक्रीय नव्हते. मात्र, कच्च्या मालाची निवड, आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी कल्पना सुचवणे, अशा पद्धतीने चोरडिया कुटुंबासह नातेवाईकांच्याही उद्योगांना मार्गदर्शन करत असत.
‘भाऊ’ यांचा मित्रपरिवार मोठा होता. मसाले उद्योगातील स्पर्धक कंपन्यांमध्येही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी अनेक नातेवाईकांना फूड प्रॉडक्ट्स व्यवसाय करण्यासाठीही भरभरुन सहकार्य केले आहे. रुग्णालय, शैक्षणिक संस्था, समाजातील गरजू, सैनिक यांच्या मदतनिधीसाठी ते नेहमीच अग्रभागी असत. १९८३ मध्ये लघुउद्योग महासंघाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९८४ आणि १९९३ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९९१-९२ मध्ये आंबा महोत्सवामध्ये ‘प्रवीण लोणचे’ या उत्पादनाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
जीवनावर चित्रपट, पुस्तक
लौकिकार्थाने यशस्वी पण तरीही प्रसिद्धीपासून दूर असलेले हुकमीचंद चोरडिया यांच्या जीवनप्रवासाचे चित्रण करणारे ‘बिकट वाट यशाची’ हे मधुबाला राजकुमार चोरडिया यांनी लिहिलेले पुस्तक लक्षणीय ठरले आहे. तर २०१२ मध्ये ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’ या उद्योगाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हुकमीचंद आणि कमलबाई त्यांच्या जीवनावर आधारित निर्मिती करण्यात आलेला ‘मसाला’ हा मराठी चित्रपट लोकप्रिय ठरला होता.