‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि ‘सासुबाईंचं असंच असतं’ या नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे यंदाचा जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रंगभूमी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (५ नोव्हेंबर) टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनी बुधवारी दिली.
शाखेतर्फे कविता विवेक जोशी आणि शमा अशोक वैद्य यांना ‘माता जानकी’ पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेत्री रजनी भट यांना ‘प्रपंच लक्ष्मी’ पुरस्कार, संगीत रंगभूमीवरील कार्याबद्दल वंदना घांगुर्डे आणि रवींद्र घांगुर्डे यांना ‘लक्ष्मी-नारायण’ पुरस्कार, अभिनेत्री भारती बाळ गोसावी यांना ‘चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रत्येकी दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्तरार्धात नाटय़संगीत आणि नृत्याचा समावेश असलेल्या ‘जल्लोष’ कार्यक्रमात संजय डोळे, भाग्यश्री देसाई, अंबरी रेगे, सानिया गोडबोले, अंजली जोगळेकर, अशोक काळे, प्रसाद वैद्य आणि चिन्मय जोगळेकर यांचा सहभाग आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा