देशात एकीकडे बालिका बचाव मोहीम सुरू असताना पुण्यातील दौंडजवळील कुसेगावात एका महिलेने तीनही मुलीच झाल्यामुळे त्यांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली उमेश मोकाशी (वय २४, रा. भिवडी, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत वैशाली यांच्या दोन महिन्यांच्या जुळ्या मुली व दोन वर्षांची मुलगी ईश्वरी उर्फ मल्लिका यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली व उमेश यांचा २००९ मध्ये विवाह झाला होता. उमेश हे शेतकरी आहेत. त्यांना दोन वर्षांची मुलगी होती. वैशाली या दोन महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी माहेरी कुसेगाव या ठिकाणी आल्या होत्या. त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या होत्या. तेव्हापासून त्या निराश होत्या.
वैशाली यांचे आई-वडील बाहेर गेल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी दोन महिन्यांच्या दोन जुळ्या मुलींना बाथरुमच्या टबमध्ये बुडवून मारले. त्यानंतर दोन वर्षांच्या ईश्वरीला सोबत घेऊन घराजवळील विहिरीत उडी मारली. सकाळी पावणेबाराच्या सुमारास नागरिकांना विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व इतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यांनी घराची पाहणी केली असता बाथमरूच्या टबमध्ये दोन महिन्यांच्या जुळ्या मुलींचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही मुली झाल्यामुळे नैराश्येतून त्यांनी मुलींचा खून करीत स्वत: आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Story img Loader