पिंपरीच्या संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात बीबीएच्या तिसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या विद्यार्थिनीकडे चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये तिने परीक्षेचा पेपर अवघड गेल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
स्नेहा दिलीप गवई (वय २३, रा. संत तुकारामनगर, पिंपरी, मूळगाव- नागपूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. स्नेहा बीबीएच्या पहिल्या दोन वर्षांत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात बीबीएच्या तिसऱ्या वर्षांला शिकत होती. सकाळी महाविद्यालयात आल्यानंतर तिने सातव्या मजल्यावरून उडी मारली. तिला तत्काळ डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्नेहाचे वडील नागपूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्यानंतर मुलीच्या खोलीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मुलीने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. त्या चिठ्ठीत तिने बीबीएच्या तिसऱ्या वर्षांचा एक पेपर अवघड गेल्याचे म्हटले आहे. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader