विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या ही अगदी महाविद्यालयांसाठीही चिंतेची बाब ठरली आहे. मात्र, काही अपवाद वगळता अजूनही बहुतेक महाविद्यालयांमध्ये अजूनही समुपदेशनाची सुविधा नाही. अभ्यास, स्पर्धा, नातेसंबंधांमधील तणाव अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या चर्चा आहेत. सलग घडणाऱ्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आत्महत्येच्या आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर पिंपरी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्येही विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती. जानेवारी महिन्यात आयएलएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची घटना आणि रविवारी घडलेली शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची घटना! विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही महाविद्यालये, शिक्षणसंस्था, पालक या सर्वासाठीच चिंतेचा विषय ठरला आहे. मात्र, अजूनही बहुतेक महाविद्यालयांमध्ये समुपदेशनाची सुविधा नाही. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयांनी समुपदेशक नेमण्याबाबत शासनाने दोन वर्षांपूर्वी सूचना दिल्या होत्या. मात्र, समुपदेशक नेमणे हा ‘नियम’ नसल्यामुळे काही अपवाद वगळता महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही समुपदेश सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मिळू शकतो. मात्र, त्यासाठीही महाविद्यालये अर्ज करताना दिसत नाहीत.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची कारणे काय?
‘‘आत्महत्या करणारे बहुतेक विद्यार्थी हे १८ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. वाढलेला अभ्यास, स्पर्धा यांमुळे विद्यार्थ्यांना ताणाला तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांमध्येही प्रतिष्ठेच्या, यशाच्या संकल्पानांमध्ये फरक पडत आहे. काळाबरोबर नातेसंबंधांमध्येही फरक पडत चालला आहे. अनेकदा स्वत:बद्दलच्या कल्पना, स्वत:चा कल यांबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यामुळे घडलेली एखादी घटना स्वीकारण्याची, काही वेळी नकार पचवण्याची विद्यार्थ्यांची मानसिक तयारी दिसत नाही. अनेकदा परीक्षा, स्पर्धा यांमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. संवादाचा अभाव हे कारण त्यामागे दिसून येते.’’
– निकी लांबा, समुपदेशक, आयएलएस महाविद्यालय
आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल?
‘‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागे वाढलेली स्पर्धा हा भाग आहेच. मात्र, त्यापेक्षाही संवादाचा अभाव हा मोठा घटक दिसतो. बदलेल्या कुटुंब पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा घरात संवाद आणि त्यांना मिळणारा आधार कमी झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर नक्कीच उपाययोजना करणे शक्य आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये मानसशास्त्र विभाग आहेत, त्यातील शिक्षक प्राथमिक समुपदेशन करू शकतील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीचा वापर करून हेल्पलाइन तयार करणे, शिक्षकांना प्राथमिक समुपदेशनासाठी प्रशिक्षण देणे असे उपाय करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींच्या कक्षामध्ये त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके उपलब्ध करून देणे याचाही उपयोग होऊ शकतो.’’
– डॉ. राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर