पुणे : गेल्या काही वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे जीवन संपवत असल्याचेही समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत आता वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व शासकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी छात्रमानस योजना राबविण्यात येणार आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार राज्यात ५ वर्षांत १४ वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही राज्यात वैद्यकीयच्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. यावर तोडगा म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने छात्रमानस योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.
हेही वाचा – कारण राजकारण : कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांना कोथरूड पुन्हा मानवेल?
शारीरिक विकारांची लक्षणे दिसून येत असल्याने त्यावर उपचार केला जातो. परंतु, मानसिक विकारांची लक्षणे बरेचदा दिसून येत नसल्याने त्यावर वेळीच उपचार होत नाहीत. त्यामुळे नैराश्यग्रस्त होऊन विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. आता या विद्यार्थ्यांचे समुपदेश केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य सबलीकरणासाठी छात्रमानस योजना राबविण्यात येणार असून, प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छात्रमानस कक्ष सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये कंत्राटी तत्वावर दोन मानसोपचार समुपदेशक नियुक्त करण्यात येणार आहेत. याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
मूल्यमापन करण्यासाठी समिती
छात्रमानस योजनेंतर्गत उपाययोजना करण्यासाठी तसेच योजनेचा नियमितपणे आढावा व मूल्यमापन करण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक (मानसशास्त्र), सदस्यपदी सहयोगी प्राध्यापक (मानसशास्त्र) आणि सदस्य सचिवपदी समाजसेवा अधीक्षक असतील. ही समिती विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी वार्षिक कार्यक्रमाची रूपरेषा तयार करेल.
करोनानंतर वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षणामध्ये ऑनलाइन माध्यम वाढले आहे. यामुळे विद्यार्थी सतत त्यांच्या मोबाईलमध्ये अडकलेले असतात. विद्यार्थ्यांची सामाजिक देवाणघेवाण वाढावी, यासाठी महाविद्यालयांच्या पातळीवरही फारसे प्रयत्न होत नाहीत. महाविद्यालयांनी सांस्कृतिकसह इतर कार्यक्रमांचे आयोजन करून वैचारिक आदानप्रदान वाढविण्याची गरज आहे. याचबरोबर समुपदेशनामुळेही विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. – डॉ. प्रतीक देबाजे, अध्यक्ष, मार्ड
© The Indian Express (P) Ltd